महापालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करणारी औषध खरेदी स्वयंसेवी संस्थांच्या आक्षेपानंतर गेल्या वर्षी रद्द करण्यात आली असली, तरी पुन्हा एकदा तशाच पद्धतीने औषध खरेदी करण्याचे प्रयत्न महापालिकेत सुरू झाले आहेत.
महापालिकेतर्फे विविध प्रकारची कीटकनाशके व फवारणीसाठी लागणारी काही औषधे गेल्या वर्षी खरेदी केली जाणार होती. मात्र, त्या औषधांचे बाजारभाव, शासनाचे दर तसेच अन्य महापालिकांचे औषध खरेदीदर यापेक्षा पुण्यात ही खरेदी लाखो रुपये जादा दराने करण्याचे प्रयत्न सुरू होते. स्वयंसेवी संस्थांनी या खरेदीला आक्षेप घेतल्यानंतर हा गैरव्यवहार बाहेर आला आणि खरेदी रद्द करण्यात आली. त्याच औषधांची खरेदी आता पुन्हा केली जाणार असून या वेळीही निविदा प्रक्रिया योग्यप्रकारे राबवली जात नसल्याची लेखी तक्रार सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी मंगळवारी आयुक्तांकडे केली. या खरेदीसाठीचे निवेदन घाईघाईने स्थायी समितीपुढे ठेवून ते मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
टॅमिफॉस हे औषध गेल्यावर्षी १,१७४ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्याची आठ हजार लिटर इतकी खरेदी केली जाणार होती. या वेळी याच औषधाचा दर प्रतिलिटर ७०२ रुपये असा आला आहे. हा दरही अधिक आहे. तरीही दरांचा विचार करता गेल्यावर्षी संबंधितांकडून ३६ लाख ७६ हजार रुपये जादा मिळवण्याचा प्रयत्न झाला होता. याला जबाबदार कोण आहे, असाही प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
निविदा प्रक्रिया योग्य रीत्या न राबवणे, कागदपत्रे खुली न ठेवणे, निविदा प्रक्रिया राबवताना बाजारभावांची माहिती न घेणे, कागदपत्रात खाडाखोड असतानाही निविदा स्वीकारणे तसेच गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी महापालिकेला औषधपुरवठा करण्यास नकार दिला होता, त्यांना महापालिकेने काय उत्तर पाठवले याची माहिती न देणे असे अनेक प्रकार प्रशासनाकडून केले जात असून त्याची आयुक्तांनी तसेच स्थायी समितीने दखल घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
पालिकेच्या औषध खरेदीत पारदर्शकता नसल्याची तक्रार
औषधांचे बाजारभाव, शासनाचे दर तसेच अन्य महापालिकांचे औषध खरेदीदर यापेक्षा पुण्यात ही खरेदी लाखो रुपये जादा दराने करण्याचे प्रयत्न सुरू होते. स्वयंसेवी संस्थांनी या खरेदीला आक्षेप घेतल्यानंतर हा गैरव्यवहार बाहेर आला.

First published on: 30-04-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc medicine purchase transparency