पुणे महापालिका सभेत मार्शल बोलावण्याची परवानगी मागण्यात आल्यामुळे पालिका सभेच्या घसरत चाललेल्या ‘दर्जा’वर शिक्कामोर्तब झालेले असले, तरी मुळातच सर्वपक्षीय नगरसेवकांचे मुद्दे आणि त्यांच्यातील संवाद संपल्यामुळे ते गुद्यांवरच येणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनात सुधारणा कशी होईल याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याकडे ज्येष्ठ राजकीय मंडळांनी लक्ष वेधले आहे.
महापालिका सभेत कामकाज न करता आंदोलनांसारखे प्रकार सातत्याने करायचे, कामकाज ठरवून हाणून पाडायचे असे प्रकार सातत्याने घडायला लागल्यामुळे एकूणच सभेच्या गुणवत्तेबाबत सध्या नगरसेवकांवर टीका होत आहे. यापूर्वीही सभेत विविध राजकीय पक्षांचे सदस्य उपस्थित असायचे, ते परस्परांच्या धोरणांवर कठोर टीका करायचे, एकमेकांचे वाभाडे काढायचे. मात्र ही सर्व टीका वा भाषणे एका विशिष्ट पातळीच्या खाली कधीच येत नसत. सद्यस्थितीत मात्र चर्चा वा भाषणे करण्याऐवजी मुद्दे मांडण्याऐवजी जो तो हमरीतुमरीवरच येतो असे चित्र आहे.
एवढे दर्जेदार कामकाज होते..
ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांनी पुणे महापालिकेतील सभेच्या कामकाजाबाबत वेळोवेळी गौरवोद्गार काढले होते. लोकसभेत ज्या पद्धतीने भाषणे होतात, त्याच पद्धतीने येथे अभ्यासपूर्ण भाषणे होतात. किंबहुना त्या सभागृहापेक्षाही या सभागृहाचे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालते. इथे जी भाषणे होतात ती दर्जेदार असतात, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी एकदा तत्कालीन महापौर भाई वैद्य यांच्याशी बोलताना व्यक्त केली होती. भाईंनीच ही आठवण ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितली.
———-
जुन्या नगरसेवकांच्या कामगिरीची झलक..
डॉ. बाबा आढाव
नगरसेवक म्हणून काम करत असताना महापालिका सभेत बाबा अतिशय प्रभावी भाषणे करत असत. विशेषत: शहराच्या पश्चिम भागात सुधारणा होतात आणि पूर्व भाग सुधारणांपासून वंचित राहतो, हा विषय बाबा सातत्याने सभेत मांडत. सर्व सुधारणा पश्चिम भागात होतात आणि पूर्वेकडे कोणाचे लक्षच जात नाही, हा बाबांचा मुद्दा असे. झोपडपट्टीवासियांचे प्रश्नही बाबांच्या भाषणांमधून वारंवार उपस्थित केले जात असत.
———
शिवाजीराव आढाव
शिवाजीराव नारायण पेठेतून जनसंघातर्फे पालिकेवर निवडून जात असत. अत्यंत अभ्यासू नगरसेवक ही त्यांची ख्याती होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्वही विलक्षण प्रभावी होते. सभेत शिवाजीराव बोलायला उभे राहिले की, अधिकाऱ्यांची तारांबळ उडत असे. एखाद्या भ्रष्टाचाराबाबत वा गैरप्रकारांबाबत ते पुराव्यांनिशीच बोलत असत. बोलत असताना झब्ब्यातील खिशात शिवाजीरावांनी हात घातला, तर अधिकाऱ्यांचे काही खरे नाही, हे सर्वाना माहिती असे. कारण खिशातून ते असा पुराव्याचा कागद बाहेर काढत की समोरच्याला हारच मानावी लागे.
———
अनिल शिरोळे
अगदी अलीकडच्या काळातील अनिल शिरोळे यांची सभागृहातील कामगिरीही सर्वाच्या लक्षात आहे. शिरोळे आता पुण्याचे खासदार आहेत. नगसेवक असताना सभागृहातील शेवटच्या ओळीत शेवटून चौथ्या, पाचव्या बाकावरील त्यांची जागा ठरलेली असायची; पण त्या जागेवरूनही ते बोलायला उठले, तर सभागृहात पूर्ण शांतता होत असे. किरकोळ कारणांनी सभा तहकूब करण्याच्या आणि सभेत कामकाज न करण्याच्या, गोंधळ घालण्याच्या प्रकारांबाबत ते सातत्याने विरोधी भूमिका मांडत. संपूर्ण सभागृह एका बाजूला आणि शिरोळे यांची भूमिका एकीकडे असेही प्रसंग सभेत यायचे आणि अशावेळी शेवटी त्यांचेच म्हणणे स्वीकारले जायचे. नागरिक आपल्याला पालिकेत निवडून पाठवतात ते कामकाज करायला. मग सभा सारखी तहकूब कशाला करायची अशी त्यांची भूमिका असायची.

 महापौरांच्या हातात सदस्यांना निलंबित करण्याचे अधिकार गेले, तर पुन्हा त्यातही राजकीय वाद होऊ शकतात. अधिकाराचा गैरवापर केला गेला असेही आरोप होऊ शकतात. म्हणून सर्व पक्षनेत्यांनीच एकत्र येऊन सभेसाठीची नियमावली तयार करावी आणि तिचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्या त्या पक्षांच्या पक्षनेत्यांनीच योग्य ती कारवाईची कृती करावी.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा