पुणे मेट्रोच्या आधी नागपूर मेट्रोला मंजुरी देऊन केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे असा आरोप करत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी मुख्य सभेतच घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनाला भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत तुमचे सरकार केंद्रात होते तेव्हा काय केले, आता कशाला आंदोलन करता असा  प्रश्न करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले.
नागपूर मेट्रोचे भूमिपूजन गुरुवारी (२१ ऑगस्ट) मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्यामुळे या कार्यक्रमामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभेतच आंदोलन सुरू केले. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा देत हातात फलक घेऊन महापौरांच्या आसनासमोर आले. केंद्र सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणा या वेळी दिल्या जात होत्या. राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू झाल्यानंतर काँग्रेसचेही नगरसेवक त्यात सहभागी झाले आणि तेही घोषणा देऊ लागले.
मेट्रोला मंजुरी देताना केंद्राने दुजाभाव केला आहे आणि पुणे मेट्रोचा प्रकल्प जाणूनबुजून मागे ठेवला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्राने तातडीने मंजुरी दिली नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी राष्ट्रवादीने दिला. सत्ताधाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यावर टीका करणारी भाषणे भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सुरू केली. केंद्राने दुजाभाव केलेला नाही. मुळात एवढी वर्षे तुमचीच केंद्रात सत्ता होती. त्या काळात मेट्रो प्रकल्प का मंजूर केला नाही, असा प्रश्न यावेळी युतीचे सदस्य विचारत होते.

Story img Loader