महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी अभिनंदन आणि श्रद्धांजली असे दोन विषय एकत्र करून सभा तहकूब करण्याचा जो प्रकार केला त्या प्रकारावर जोरदार टीका होत असून सभेत झालेले कामकाज म्हणजे मोठी परंपरा असलेल्या महापालिका सभागृहाचे दुर्दैव आहे, अशीही भावना व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीत मेट्रोसह पुणे शहराशी संबंधित विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्या बद्दल केंद्र सरकार तसेच नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू आणि त्या बैठकीत उपस्थित असलेले शरद पवार, अजित पवार यांचे अभिनंदन करण्याच्या मुद्यावरून पालिका सभेत गुरुवारी पक्षीय राजकारण झाले. तसेच सभेत मतदानही घ्यावे लागले. या राजकारणामुळे या सर्व नेत्यांचे अभिनंदन करणारी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांना श्रद्धांजली अर्पण करणारी तहकुबी एकत्र करून सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या एकत्र तहकुबीवरून आता सर्वच राजकीय पक्षांवर टीका होत आहे.
माजी महापौर अंकुश काकडे यांनी या प्रकारावर जोरदार टीका केली असून तसे पत्र त्यांनी शुक्रवारी महापौरांना दिले. महापालिकेच्या सभेत घडलेले प्रकार पाहून हेच का ते सुसंस्कृत शहर, हीच का राज्याची सांस्कृतिक राजधानी असा प्रश्न मनात आला. पूर्वीही सभागृहात तहकुबी मांडल्या जात असत. मात्र असे वाद तेव्हा होत नव्हते. दुखवटय़ाची तहकुबी मांडली जात असताना अभिनंदनाची तहकुबी मांडून आपल्या अकलेची दिवाळखोरी पुणेकरांना दाखवतो आहोत, याचे भान माननीयांना नसेल तर ते सभागृहाचे दुर्दैव आहे, असे काकडे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सभागृहावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापौर म्हणून आपली असते. त्या बरोबरच पक्षनेत्यांचे त्यांच्या पक्षातील सदस्यांवर नियंत्रण नाही. त्यामुळे सभागृहात वापरली जाणारी भाषा, तेथील विनोद, वातावरण हा देखील महत्त्वाचा विषय आहे. सभेचे कामकाज नियमानुसार होण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत बंद झाली आहे. तातडीचे प्रश्न, लेखी प्रश्न, माहिती घेण्याचे मुद्दे, हरकतीचे मुद्दे या सर्व बाबी सभागृहाच्या एका कोपऱ्यात जाऊन पडल्या आहेत. यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण कठोर भूमिका घ्यावी. कोणाला काय वाटेल याचा विचार करू नये. सर्व गटनेत्यांना एकत्र करून, प्रशासनाला बरोबर घेऊन आपण कामकाजात सुधारणा होईल, यासाठी प्रयत्न करा.
—
महापालिका सभागृहात राजकीय विषयांवरील तबकुबी मांडायच्या नाहीत असा निर्णय झाला होता. त्याचे पालनही आठ-दहा वर्षे झाले होते. मात्र आता पालिका सभेत राजकीय तहकुबी मांडल्या जात असल्यामुळे वातावरण बिघडून गेले आहे. खुद्द पक्षांचे वरिष्ठ नेतेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत नाहीत. असे असताना सर्व पक्ष असे प्रकार का करतात, कोणी निर्णय घेतले हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नसते.
– अंकुश काकडे
माजी महापौर, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस
.. जरा नियमानुसार कामकाज करा
महापालिकेच्या सभेत घडलेले प्रकार पाहून हेच का ते सुसंस्कृत शहर, हीच का राज्याची सांस्कृतिक राजधानी असा प्रश्न मनात आला
First published on: 12-09-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc metting rule