महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी (५ मार्च) होत असलेली निवडणूक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची ठरली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा नवा पॅटर्न महापालिकेत होणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तसेच काँग्रेस, मनसे आणि भाजपचे प्रत्येकी तीन, तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. महापालिकेच्या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेत आली. त्या वेळी पाच वर्षांत चौथ्या वर्षांतील स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे दोन्ही पक्षांमध्ये ठरले होते. मात्र, राष्ट्रवादीने या वेळी काँग्रेसला अध्यक्षपद देण्याऐवजी स्वत:चाच उमेदवार उभा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने अश्विनी कदम यांना, काँग्रेसने चंद्रकात ऊर्फ चंदूशेठ कदम यांना आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. महापालिका सभागृहात गुरुवारी सकाळी अकरा वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक मते असल्यामुळे आणि काँग्रेस व भाजप-शिवसेना युतीही निवडणूक लढणार असल्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरेल, असेच चित्र आहे.
स्थायी समितीसाठी मनसेला नाशिकमध्ये राष्ट्रवादीची मदत आवश्यक असून त्या मोबदल्यात मनसे पुण्यात राष्ट्रवादीला मदत करेल अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीला प्रत्यक्ष मतदान न करता मनसेचे सदस्य निवडणुकीत तटस्थ राहतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्वत:ची सहा मते मिळतील आणि त्यांचा उमेदवार विजयी होईल, अशीही शक्यता आहे.
काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले पाहिजे – बागूल
महापालिकेतील सत्तेत राष्ट्रवादीने जो शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला पाहिजे. निवडणुकीबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना माहिती दिली असल्याचे उपमहापौर आबा बागूल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसने यापूर्वी महापालिकेच्या विविध पदाधिकारी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मते दिली आहेत. त्यांनी आता मते दिली नाहीत, तर आम्हाला आमचे धोरण ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2015 रोजी प्रकाशित
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज पालिकेत नव्या पॅटर्नची शक्यता
महापालिकेच्या सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तसेच काँग्रेस, मनसे आणि भाजपचे प्रत्येकी तीन, तर शिवसेनेचा एक सदस्य आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 05-03-2015 at 03:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc ncp mns standing committee