पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) संशयित रुग्ण आढळत असलेल्या आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी, नांदेड या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्याने या गावांना हे पाणी देणे शक्य नाही.
या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यामध्ये दूषित पाणी जात असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांकडून केली जात असून, या गावांना शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवे, अशी शिफारस पाणी तपासणाऱ्या प्रयोगशाळेने केली आहे.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठीचा आराखडादेखील महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला खर्चदेखील करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र, या गावांना पाणी पुरविण्यासाठी महापालिकेला खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठीची मागणी यापूर्वीच महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने या गावांमधील पाणीपुरवठा योजना रखडणार आहे.
समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे येथे जलवाहिनी व टाक्या बांधल्या जातील. त्यानंतर बावधन भागात काम करून थेट पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे लोहगाव-वाघोली या टप्प्याचेही काम सुरू आहे. या सर्व समाविष्ट गावांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठ्याची योजना राबविली जाणार असून, यासाठी किमान ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. लोहगाव-वाघोली पाणी योजनेसाठी पाण्याच्या वाढीव कोट्याला मान्यता देण्यात आली आहे.
‘दहा गावांसाठी वाढीव पाणी मिळावे’
खडकवासला, किरकिटवाडी यासह दहा गावांमधील नागरिकांना पाणी देण्यासाठी सध्या पालिकेला मिळत असलेल्या पाण्यामध्ये २५ एमएलडी वाढीव पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महापालिकेच्या हद्दीत आलेल्या गावांना शुद्धीकरण केलेले पाणी देता यावे, यासाठी खडकवासला धरणाच्या क्षेत्रातील जलसंपदा विभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी मिळावी, अशी मागणीदेखील महापालिकेने यापूर्वी केली असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या १० गावांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचा आराखडा करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक पाणी नसल्याने तो मागे ठेवण्यात आला होता. सध्या या गावांची गरज लक्षात घेता हा प्रस्ताव पुन्हा मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. तसेच, शासनाकडे जादा पाण्यासाठी पुन्हा एकदा मागणी केली जाणार आहे.