ससून रुग्णालयाच्या आवारातील घटना

पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.

महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. याबाबत एकाने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader