पुणे : अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा दिवाळीप्रमाणे साजरा करावा, या भाजपच्या आग्रहानंतर शहरातही दिवाळीप्रमाणे फटाका स्टाॅल्स उभारणीला महापालिकेने परवानगी दिली आहे. शनिवार पेठेतील वर्तक उद्यान परिसराच्या मागील बाजूस फटाका विक्री स्टाॅल्स उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तीन दिवस स्टाॅल्सला परवानगी देण्यात आली आहे. फटाका स्टाॅल्सला परवानगी द्यावी, यासाठी शहर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर त्यासाठी दबाव टाकल्याची बाबही पुढे आली आहे.
अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येत्या सोमवारी (२२ जानेवारी) होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा देशातील मोठा सोहळा असल्याने यानिमित्ताने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा दिवाळीप्रमाणे उत्साहात साजरा करावा, अशी भूमिकाही घेण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीप्रमाणे शहरात फटाका स्टाॅल्सची उभारणी सुरू झाली आहे.
या सोहळ्याच्या आधी चार दिवस फटाका विक्री स्टाॅल्सना परवानगी द्यावी, अशी मागणी काही विक्रेते आणि राजकीय पक्षांनी महापालिकेकडे केली होती. मात्र त्याबाबतचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. सोमवारी जल्लोष होण्याची शक्यता असल्याने फटाका स्टाॅल्सला परवानगी द्यावी, अशी सूचना पोलीस आयुक्त कार्यालयाने महापालिकेला केली. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन स्टाॅल उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेने दिवाळीला दिलेल्या मान्यतेवर ही परवानगी दिली आहे.
-अभिजित गोरिवले, फटाका विक्रेते
हेही वाचा : राम मंदिरात विशेष दर्शन, देणगीच्या नावाने होऊ शकते फसवणूक; पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन
महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिवाळी वेळी ऑनलाइन पद्धतीने गाळ्यांचा लिलाव केला होता. त्यासाठी शहराच्या काही भागांतील जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. ज्या फटाका स्टाॅलधारकांनी दिवाळीत नियमानुसार आणि अनामत रक्कम भरून परवानगी घेतली होती, त्यांनाच या सोहळ्यासाठी फटाका स्टाॅल्स उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. साधारणपणे किमान १४ हजार रुपयांचे भाडे स्टाॅलधारकांकडून आकारण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता सेवा शुल्काचाही समावेश असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दलाच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याची सूचना स्टाॅलधारकांना करण्यात आली आहे. दिवाळीत नदीपात्रात ३५ गाळ्यांना परवानगी देण्यात आली होती. सध्या दहा ते पंधरा स्टाॅलधारकांनी स्टाॅल उभारणीची कामे सुरू केली आहेत. वानवडी येथेही ही प्रक्रिया सुरू झाली आहे.