तुम्ही रस्त्यावर पडलेले खड्डे कळवा, आम्ही ते चोवीस तासांत दुरुस्त करू, या महापालिकेने सुरू केलेल्या कार्यक्रमाला गेल्या दहा दिवसांत मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता शहरातील रस्त्यांची परिस्थिती यंदा चांगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या आवाहनानुसार गेल्या दहा दिवसांत संपूर्ण शहरातून फक्त ५६ तक्रारी पथ विभागात आल्या. त्यातील १६ तक्रारींचे निराकरण लगेच करण्यात आले, तर अन्य अनेक तक्रारी महापालिका हद्दीतील नव्हत्या.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील खड्डय़ांचा प्रश्न गाजला होता. शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांना खड्डे पडले होते आणि त्यामुळे पथ विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काही ठेकेदारांच्या कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईबाबतही चर्चा झाली होती. गेल्या वर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन महापालिकेने यंदा गेल्या महिन्यापासूनच शहरात डांबरीकरणाची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू केली आहेत. ही कामे पुढेही सुरू राहणार आहेत. आवश्यक तेथे डांबरीकरण व खड्डे बुजवण्याची कामे सुरू असतानाच महापालिकेने खड्डय़ांची माहिती कळवण्याचे आवाहन नागरिकांनाही केले होते. त्यासाठी खास दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला होता.
खड्डय़ांसंबंधीच्या तक्रारी कळवल्यानंतर त्या तक्रारीचे निराकरण चोवीस तासांत केले जाईल. तसेच ज्या नागरिकाने तक्रार केली असेल, त्या नागरिकालाही खड्डा दुरुस्त झाल्याची माहिती दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. हे आवाहन २० मे रोजी प्रसिद्ध झाले. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत ५६ तक्रारी नागरिकांनी केल्या. आलेल्या तक्रारींची नोंद करून ती संबंधित भागातील अभियंत्याला कळवणे तसेच खड्डे दुरुस्तीबाबतची माहिती तक्रारदाराला मिळेल याची व्यवस्था करणे यासाठीच्या समन्वयक म्हणून पथ विभागातील जयश्री रजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती गुरुवारी ‘लोकसत्ता’ला दिली. पथ विभागाकडे आतापर्यंत ज्या तक्रारी आल्या त्यातील १६ तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात आले. काही तक्रारी पिंपरी महापालिका तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीतील होत्या. त्यामुळे तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात आली. तसेच काही तक्रारी शहरातील खड्डय़ांच्या होत्या. मात्र, भूसंपादन वा अन्य प्रक्रियांमध्ये जी कामे आहेत तेथील त्या तक्रारी होत्या. त्यामुळे अशा तक्रारींचे निराकरण शक्य नव्हते. तसेच काही तक्रारी पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग यांच्याशी संबंधित होत्या. त्या तक्रारदारांना त्या त्या विभागांचे दूरध्वनी क्रमांकही देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ज्या अभियंत्याकडे खड्डे दुरुस्तीची जबाबदारी आहे, त्या अभियंत्याने संबंधित तक्रारदाराला दुरुस्तीबाबत कळवणे अपेक्षित असून त्यानुसार आवश्यक ती माहिती दिली जात आहे.
खड्डय़ांची माहिती कळवण्यासाठी:
०२०-२५५०१०८३
खड्डा पडल्याचे ठिकाण, तक्रारदाराचे नाव व मोबाइल क्रमांक कळवावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा