शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांबरोबरच आता रस्त्यांची कामे ज्या अधिकाऱ्यांच्या वा अभियंत्यांच्या देखरेखीखाली होतात त्यांच्यावरही लक्ष ठेवा, असा आदेश महापौर चंचला कोद्रे यांनी बुधवारी पालिका प्रशासनाला दिला.
खड्डय़ांच्या प्रश्नाबाबत महापौर चंचला कोद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, सभागृहनेता सुभाष जगताप आणि विनायक हनमघर यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त विकास देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. प्रत्येक पावसाळ्यात शहरात खड्डयांचा प्रश्न उद्भवत असून गेली दोन वर्षे हा त्रास विशेषत्वाने जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून ठेकेदारांच्या कामांवर जसे लक्ष ठेवले जाते, तशाच पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात हे रस्ते तयार होतात त्यांची परिपूर्ण माहिती ठेवली जावी. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या/अभियंत्याच्या कामात तीन वा पाचपेक्षा अधिक दोष आढळतील त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
पाऊस थांबल्यानंतर खड्डय़ांच्या प्रश्नाचा नेहमीच प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींनाही विसर पडतो. या वेळी मात्र या प्रश्नाबाबत आम्ही अतिशय दक्ष राहणार असून रस्त्यांची तसेच खड्डे दुरुस्तीची कामे चांगली व्हावीत या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत, असे वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खड्डय़ांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांचा आग्रह आम्ही धरला आहे. पुढच्या काळात रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण कशी होतील याकडे लक्ष दिले जावे, अशीही मागणी केल्याचे त्या म्हणाल्या. केबल तसेच अन्य कामांसाठी रस्ते खोदले जातात. त्यानंतर त्यांची दुरुस्ती योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे या चर्चेत प्रशासनाकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा