महापालिकेच्या मिळकत कर विभागातर्फे मिळकत कराच्या देयकांचे (बिले) वाटप लवकरच सुरू केले जाणार असून बिले मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी पीएमसी कनेक्ट ही बिलांची माहिती देणारी लिंक तयार करण्यात आली आहे. मिळकत कराच्या बिलांबरोबरच कराची सद्य:स्थिती देखील या लिंकवर पाहता येईल. तसेच महापालिकेच्या विविध सुविधांचा लाभही लिंकद्वारे घेता येईल.
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि कर संकलन खात्याचे प्रमुख, उपायुक्त सुहास मापारी यांनी महापालिकेतर्फे सुरू करण्यात येत असलेल्या या सुविधेची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक संस्था कराबद्दल (लोकल बॉडी टॅक्स – एलबीटी) असलेली अनिश्चितता पाहता यंदा महापालिकेसाठी मिळकत कराचे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मिळकत कर संकलनाची प्रभावी यंत्रणा राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळकत कराची आगामी आर्थिक वर्षांची बिले २५ मार्चपासून वितरित केली जाणार असून ज्यांना ही बिले मिळणार नाहीत अशा मिळकत धारकांना ती महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मुख्य भवनातही देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मिळकत कराची बिले मिळण्याबाबत तसेच अन्य तक्रारींबाबत स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या बरोबरच महापालिकेने पीएमसी कनेक्ट ही लिंक आणि संकेतस्थळही तयार केले आहे. या लिंकवर किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावरूनही मिळकत कराच्या सद्य:स्थितीबाबतची माहिती मिळकत धारकाला मिळू शकेल. मिळकत कराचे बिल आणि मिळकतीसंबंधीची माहिती या लिंकवर वा महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येईल, असेही जगताप यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा