पूर का आला याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी पालिका आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती.
पुणे : सिंहगड रस्त्यासह शहरातील विविध भागांत जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी चार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने अहवाल पालिकेला दिला असून, यात ठोस उपाययोजना न सुचविल्याने ही समिती केवळ फार्सच ठरली आहे. नदीपात्रात बेकायदा बांधकामे होऊ देऊ नये, घनकचरा-राडारोडा येणार नाही याची काळजी घ्यावी, नदीच्या पाण्याला अडथळा ठरणारे विनावापर बंधारे व भिंती काढून टाकाव्यात, अशा उपाययोजना या समितीने सुचविल्या आहेत.
शहरातील नदीच्या पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्याने नदीची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यातच नदीच्या कडेला होत असलेली बेकायदा बांधकामे, निळ्या पूररेषेत पालिकेने बांधकामांना दिलेली परवानगी, तसेच ओढे, नाले यांचे वळविण्यात आलेले प्रवाह यामुळे प्रत्येक पावसाळ्यामध्ये शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. यावर उपाय करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी समित्या नेमल्या होत्या. या समितीमधील सदस्यांनी अहवाल देताना त्यामध्ये शिफारशी केल्या आहेत.
हेही वाचा >>> बंगळुरुतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गु्न्हा
पाच महिन्यांपूर्वी जुलैअखेर शहर आणि धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवरील एकतानगरी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. मध्यरात्री अचानकपणे पहिल्या मजल्यापर्यंत हे पाणी शिरले होते. यामध्ये अनेक कुटुंंबांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात याची चर्चा झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. त्या वेळी शिंदे यांनी याचा सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिला होता.
शहरातील विविध भागांत पावसाचे पाणी कसे शिरले, त्याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी चार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. यामध्ये पालिकेच्या पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, मलनि:सारण विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे आणि जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने महिनाभर अभ्यास करून आपला अहवाल पालिकेला दिला आहे. यामध्ये या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचे ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हेही वाचा >>> बलात्काराचा गु्न्हा दाखल करण्याच्या धमकी; खंडणी उकळणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा
नदीत राडारोडा टाकला जात असल्याने नदीची वहनक्षमता कमी झाली आहे. बेकायदा बांधकामे होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, निळ्या पूररेषेत बांधकामे होऊ देऊ नयेत, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे हा अहवाल फार्स असल्याचा आरोप केला जात आहे.
पालिका आयुक्तांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये पूर येण्याचे कोणतेही ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. नदीच्या कडेला झालेली बेकायदा बांधकामे, नदीत टाकला जाणारा राडारोडा यामुळे वहनक्षमता घटल्याने म्हटले आहे. हा अहवालातून कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
मुठा नदीला आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल जाहीर झाला आहे. नदीची सध्याची स्थिती टाळण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य कारवाई केली जाईल, उपाययोजना केल्या जातील. – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त