पुणे : कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील नृत्य शिक्षकाने मुलांवर केलेल्या अत्याचारप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालात शाळा स्तरावरील त्रुटी उघड झाल्या आहेत. हा अहवाल शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यावर नृत्यशिक्षकाने अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय समिती नेमली. समितीने संबंधित शाळेला भेट देऊन प्राथमिक तपासणी केली. विद्यार्थी सुरक्षेसाठी २१ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयातील सूचनांनुसार शाळा स्तरावरील काही त्रुटी समितीच्या निदर्शनास आल्या. शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केलेली नाही, घटना उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांनी २४ तासांत शिक्षण विभागाला घटनेची माहिती देणे अपेक्षित असताना माहिती देण्यात आली नाही, संबंधित शिक्षकाला शाळेच्या वेळेव्यतिरिक्त आणि सुटीच्या दिवशी खासगी नृत्य शिकवणी घेण्यासाठी परवानगी देताना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली नाही, अशा त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी
इतर बाबींत, शाळेत २१० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यासाठी एका महिन्याची बॅकअप सुविधा आहे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेटी उपलब्ध आहे, सखीसावित्री समिती नेमण्यात आली आहे, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केली आहे, पूर्वप्राथमिक वर्गांसाठी महिला कर्मचारी नियुक्त आहे, शाळेत समुपदेशकाची नियुक्ती केली असल्याचे आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल सादर झाला आहे. शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता शासन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक हारून अतार यांनी सांगितले.