महापालिकेच्या जागेवर जेथे झोपडपट्टी झाली आहे, तेथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन महापालिकेनेच करावे, यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा होऊन या विषयाबाबत महापालिका प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी एकमताने घेण्यात आला.
स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासंबंधीचा हा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. महापालिका हद्दीत महापालिकेच्या जागेवर अनेक ठिकाणी झोपडपट्टय़ा झाल्या आहेत. झोपटपट्टीवासीयांचे राहणीमान उंचवावे यासाठी या झोपटपट्टीवासीयांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसन करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे व तशी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या जागेवर ज्या झोपडपट्टय़ा झाल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे डॉ. धेंडे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.
 महापालिका मालक असलेल्या जागेवर झालेल्या झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे तसेच तसा ठरावही यापूर्वी महापालिकेने केलेला असल्यामुळे या प्रक्रियेसाठी महापालिकेने धोरण तयार करावे, अशीही सूचना डॉ. धेंडे यांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात केली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून महापालिकेने पुनर्वसनाबाबत धोरण तयार करावे व तसे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला सूचित करावे, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव गुरुवारी मंजुरीसाठी आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या प्रस्तावाबाबत महापालिका प्रशासनाचा अभिप्राय घ्यावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार हा प्रस्ताव आता अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा