पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले होते. सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात देखील अनेक जुने पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पुणे महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये काही पुतळ्यांमध्ये किरकोळ डागडुजी करावी लागणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. काही जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
हेही वाचा…पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक ; एकाच कुटुंबातील चौघे जखमी, अपघातानंतर वाहतूक विस्कळीत
पुणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास पालिकेच्या भवन रचना विभागाने सुरुवात केली आहे. यामधून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले पुतळे किती सुरक्षित आहेत, हे कळण्यास मदत होणार आहे. भवन रचना विभागाने काही पुतळ्यांची पाहणी देखील केली. मात्र अनेक पुतळे ४० ते ५० वर्षे जुने असल्याने ते वरुन सुस्थितीत असले तरी मधून भक्कम आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी ‘अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट’ केली जाणार आहे, अशी माहिती भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.
शहरात ८० पुतळे
महापालिका हद्दीत महापालिकेकडून अर्धाकृती आणि पूर्णाकृती असे ८० पुतळे उभारण्यात आले आहेत. त्या पुतळ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे या सर्व पुतळ्यांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने त्यांची तपासणी केली आहे. यापैकी २५ पुतळे हे ४० ते ४५ वर्षे जुने असल्याने ते वरून सुस्थितीत दिसत असले तरी आतमधून भक्कम आहे की नाहीत, हे तपासणे आवश्यक आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून तपासणी केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा…शास्त्री रस्त्यावर तडीपार गुंडाला पकडले
शहरातील पुतळ्यांची पाहणी केली जात असून काही किरकोळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यानुसार दुरुस्ती केली जात आहे. अनेक वर्षे जुन्या पुतळ्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यासाठी जाहिरात देऊन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन रचना