पुणे शहरातल्या प्रत्येक नळजोडावर मीटर बसविण्याची योजना हाती घेतलेल्या महापालिकेला स्वत:च्या नऊ टँकरभरणा केंद्रांवर मात्र अद्याप मीटर बसवता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या केंद्रांवरून कोटय़वधी लिटर पाणी रोज वितरित होते, तेथे पाण्याचे मीटर नाहीत, ही बाब गेल्या वर्षी मार्च महिन्यात निदर्शनास आणून देण्यात आली होती. तरीही मीटर बसविण्यात आलेले नाहीत.
महापालिकेतर्फे टँकरमार्फत जे पाणी पुरवले जाते त्या केंद्रांवर मीटर नसल्यामुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याची तक्रार सजग नागरिक मंचतर्फे मार्च २०१२ मध्ये आयुक्तांकडे पुराव्यांनिशी सादर करण्यात आली होती. टँकरची नोंद न करताच अनेक टँकर पाणी भरून बाहेर जातात, या पुराव्याची सीडी आयुक्तांना सादर करून सर्व केंद्रांवर तातडीने मीटर बसवावेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. मात्र, वर्षभरात या मागणीबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
येरवडा टँकर भरणा केंद्रावरील यंत्रणा गेले काही महिने बंद असून फक्त तेथील मीटर सुरू आहे. चतु:शृंगी टँकर भरणा केंद्रामध्ये मीटरच बसवण्यात आलेला नाही. पद्मावती केंद्रातील मीटर गेले कित्येक महिने नादुरुस्त असून त्याचा उपयोग होत नाही. पर्वती जलकेंद्रात सहा टँकर पॉइंट असून त्यातील तीन पॉइंट गेल्या महिन्यात नव्याने सुरू करण्यात आले आहेत. मात्र, तेथेही मीटर बसविण्यात आलेले नाहीत. तसेच जुन्या तीन पॉइंटवरील मीटर व यंत्रणा काही महिन्यांपासून बंदच आहे. पटवर्धन बाग, वडगावशेरी, रामटेकडी या तीन भरणा केंद्रांवरील मीटर सुस्थितीत आहेत, अशी माहिती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ज्या केंद्रांवरून रोज कोटय़वधी लिटर पाणी वितरित केले जाते, त्या बारा टँकर भरणा केंद्रांपैकी फक्त तीनच केंद्रांवर मीटर असून उर्वरित ठिकाणी मीटर का बसविले जात नाहीत, असाही प्रश्न सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे. तसेच ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले, ते चालू स्थितीत का ठेवण्यात आले नाहीत, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील आम्ही मीटर बसविण्याची मागणी केली होती. महापालिकेचा गलथान कारभारच यातून दिसून येत आहे, असेही संघटनेतर्फे आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
टँकर भरणा केंद्रांवर मीटरची दुरवस्था जाणूनबुजून केली जाते की काय असा संशय बळावतो आहे, असेही संघटनेचे म्हणणे असून किमान यापुढे तरी सर्व केंद्रांवर मीटर बसवून घ्यावेत व ते कायम सुरू राहतील यासाठीची कार्यवाही करावी, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा