पुणे : शहरात सध्या साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच आता शहरात एखादा साथरोग दाखल झाल्याचे परस्पर जाहीर करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे प्रमाणही वाढले आहे. या डॉक्टरांकडून रुग्णाला संबंधित आजार झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र तपासणीत हा आजारच आढळून येत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा डॉक्टरांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
शहरात पावसाळ्यामुळे साथरोगांचा उद्रेक झाला आहे. याचवेळी वेस्ट नाईल तापाचा संशयित रुग्ण आढळल्याचे एका खासगी डॉक्टरने परस्पर जाहीर केले. याचबरोबर गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच या रोगाचा रुग्ण आढळल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविले. या तपासणीत रुग्णाला हा संसर्ग झाला नसल्याचे निदान झाले. त्यामुळे या डॉक्टरकडून रुग्णाचे चुकीचे निदान करण्यात आल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा >>> “मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही”, उमेदवार निवडीवरून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
वेस्ट नाईल ताप हा प्रामुख्याने उत्तर अमेरिका खंडात आढळून येतो. तेथून प्रवास करून भारतात आलेल्या रुग्णांमध्ये या तापाचा संसर्ग आढळून येतो. मात्र, खासगी डॉक्टरने या रोगाचा रुग्ण आढळल्याचे परस्पर जाहीर केल्याने विनाकारण रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच डॉक्टरने झिका रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेला उशिरा कळविली होती. यामुळे महापालिकेने अखेर या डॉक्टरवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई
मंकीपॉक्सबाबत हाच प्रकार
शहरात साथरोगांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही रुग्णांच्या शरीरावर तापामुळे पुरळ येतात. अशा रुग्णांना काही खासगी डॉक्टरांकडून मंकीपॉक्स झाल्याचे सांगितले जात होते. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारीही आल्या होत्या. यामुळे आरोग्य विभागाने अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याचबरोबर खासगी डॉक्टरांची बैठक घेऊनही त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
एखाद्या साथरोगाचा संशयित रुग्ण आढळल्यास खासगी डॉक्टरांनी याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यांनी परस्पर साथरोगांची माहिती जाहीर करणे चुकीचे आहे. याचबरोबर चुकीची माहिती पसरविणे योग्य नाही. यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. – डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका