पुणे : पावसाळ्यात नदीतून पाणी वाहताना अडथळा ठरणारे बंधारे तसेच कालबाह्य झालेले छोटे पूल काढून टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नदीपात्रात असलेल्या जुन्या पुलांमुळे गाळ साठून राहतो, परिणामी धरणातून पाणी सोडल्यानंतर ते वाहून जाण्यास अडथळा होतो त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते. असा निष्कर्ष पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने काढला होता. पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वापरात नसलेले जुने बंधारे काढून टाकण्याची शिफारस त्यांनी केली होती.
हेही वाचा >>> ‘एचएमपीव्ही’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दक्ष; आठ रुग्णालयांमध्ये व्यवस्था
समितीने केलेल्या शिफरशीची अंमलबजावणी करून नदीपात्रातील हे बंधारे पालिकेने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जलसंपदा विभागाशी समन्वय साधून नदीपात्रातील झुडपे आणि पाण्याला अडथळा करणारा गाळ काढण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे जुने आणि वापरात नसलेले बंधारे काढून टाकल्याने नदीची वहन क्षमता वाढणार आहे.
हेही वाचा >>> वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीत ओंकारेश्वर मंदिराजवळ वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट, डेंगळे पूल, तसेच शिवणे, खडकी, सांगवी या ठिकाणी अनेक जुने बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचा सध्या कोणताही उपयोग नाही. बंधाऱ्यांमुळे येधे गाळ साठून राहतो. धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होतो. त्यामुळे हे बंधारे काढून टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी संबंधित बंधारे उभारलेल्या संस्थांशी पत्रव्यवहार करून जलसंपदा विभागाशी महापालिका चर्चा करणार आहे. तसेच, स्वत:च्या खर्चाने हे बंधारे काढून टाकणार आहे. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी नदीपात्रातील झुडपेही काढून टाकण्यात येतील, असे पृथ्वीराज यांनी सांगितले. शहरात आलेल्या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यापुढील काळात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी सूचना केल्या होत्या. त्यामध्ये वापरात नसलेले बंधारे काढून टाकण्याचेही सुचविण्यात आले होते. शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी या समितीच्या अहवालावर विभागांनी काय कार्यवाही केली, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पाणी साचणाऱ्या किती ठिकाणी आवश्यक उपाययोजना केली गेली. पाणी उपसण्यासाठीचे पंप व अन्य साहित्याची उपलब्धता याची माहिती घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनीा सांगितले.