पुण्यात मध्यवस्तीतील प्रकल्प उपनगरात स्थलांतरित करण्याची वेळ
कचऱ्याचे विकेंद्रीकरण व्हावे आणि प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवावा, या हेतूने शहराच्या विविध भागात छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आले असले, तरी या प्रकल्पांनाच घरघर लागण्यास सुरुवात झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीमधील दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प नागरिकांच्या तक्रारींमुळे उपनगरांमध्ये स्थलांतरित करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यामुळे या कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीवर झालेला खर्चही पाण्यात गेला असून पुन्हा नव्याने प्रकल्प उभारणीसाठीचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
कचऱ्याची गंभीर आणि वाढती समस्या लक्षात घेऊन प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्याच्या दृष्टीने अनेक प्रभागात प्रतिदिन एक ते तीन टन कचरा प्रक्रिया क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार नारायण पेठेतील वर्तक उद्यानाशेजारी आणि शनिपाराजवळ अनुक्रमे अर्धा टन आणि तीन टन क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. हे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी मोठा गाजावाजाही करण्यात आला होता. प्रकल्पांच्या उभारणीसाठी तब्बल साठ लाखांचा खर्चही करण्यात आला. मात्र हे प्रकल्प सुरू होत नाहीत तोच या प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांकडून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी सुरू करण्यात आल्या.
मध्य वस्तीमधील हे दोन्ही प्रकल्प ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे आहेत. त्यातून खतनिर्मिती करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला होता. पण सहा महिन्यांच्या आतच हे प्रकल्प बंद करावे लागले आहेत. प्रकल्प बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे आता ते कुठे स्थलांतरित करायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला भेडसावत असून उपनगरांमध्ये या प्रकल्पांसाठी जागा मिळतात का, याची चाचपणी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुरूझाली आहे. विश्रामबाग वाडय़ाजवळील प्रकल्प हा विश्रांतवाडी, धनकवडी किंवा वडगावशेरी भागात हलविता येऊ शकतो का याच्या तपासणीचे काम सुरू आहे. तर नारायण पेठेतील वर्तक उद्यानातील प्रकल्प पेशवे उद्यानात स्थलांतरित करण्याचे विचाराधीन आहे.
वाढता कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत लहान-मध्यम आणि मोठय़ा क्षमतेच्या प्रक्रिया प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. काही प्रभागात बायोगॅस प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील बहुतांश बायोगॅस प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. कधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तर कधी नागरिकांच्या असहकारामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
कचऱ्याचे प्रमाण
* ओला कचरा- ६५० ते ७५० टन
* सुका कचरा- ४०० ते ४५० टन
* मिश्र कचरा- ५०० ते ५५० टन
* उद्यान कचरा- ५० ते ७० टन
* बांधकाम राडारोडा- २०० ते २५० टन
* जैववैद्यकीय कचरा- ५ टन
* दैनंदिन कचरा- १६०० ते १७०० टन