मोठय़ा प्रमाणावर फेरबदलांमुळे राजकीय समीकरणे बदलली; बहुसदस्यीय प्रभाग

प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक

सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक या नव्याने झालेल्या प्रभागात मूळ गावकरी आणि शहराच्या मध्य वस्तीतून स्थायिक झालेले मतदार असे चित्र आहे. या प्रभागात आतापर्यंत स्थानिक गावकऱ्यांचाच वरचष्मा राहिला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपला संधी मिळाली असली, तरी महापालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली होती. मात्र प्रभागात मोठय़ा प्रमाणावर फेरबदल झाल्यामुळे बदलेली राजकीय समीकरणे आणि बहुसदस्यीय प्रभाग यामुळे मूळ गावक ऱ्यांचा वरचष्मा मोडून काढत बाहेरून स्थायिक झालेले मतदार निवडणुकीचा निकाल बदलणार का, हाच प्रश्न राहणार आहे.

महापालिकेने प्रभागांची प्रारूप रचना केल्यानंतर या प्रभागाला प्रथम वडगाव धायरी-सनसिटी असे नाव होते. मात्र त्यावर मोठय़ा प्रमाणात आलेल्या हरकती आणि सूचनानंतर या प्रभागातून सनसिटी हा भाग वगळण्यात आला आणि त्यामध्ये वडगाव बुद्रुकचा समावेश करण्यात आला. त्यामुळे हा प्रभागही वडगाव धायरी-वडगाव बुद्रुक असा करण्यात आला. महापालिकेने केलेल्या मूळ प्रभाग रचनेनुसार मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे नगरसेवक असून भाजपचा बालेकिल्ला असलेला भाग या प्रभागाला जोडण्यात आला होता. प्रभागाच्या रचनेत बदल झाला असला, तरी हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल झाला असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचेही या प्रभागात प्राबल्य असून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची आघाडी न झाल्यास या दोघातच लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे.

या प्रभागात दोन जागा या सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव असून एक जागा खुल्या सर्वसाधारण गटासाठी आहे. तर एक जागा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी मोठय़ा प्रमाणावर रस्सीखेच पाहण्यास मिळणार आहे. गावकरी, नव्याने अस्तित्वात येत असलेल्या सोसायटय़ा असा हा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे पारडे जड असले, तरी स्थायिक झालेले मतदारांचा कौलही येथे महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक विकास दांगट पाटील आणि संगीता कुदळे यांचा हा प्रभाग. प्रभागात रचना सुरू झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग ३४ मधूनही दांगट पाटील निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. त्यांचा हा जुना प्रभाग असल्यामुळे त्यांना येथेही संधी असल्याचीही चर्चा आहे. मात्र प्रभाग क्रमांक ३३ मधूनच कुदळे आणि दांगट हे निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे पॅनेल करण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे.