दिवाळी संपताच पाणीकपातीचे धोरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिवसाआड पाणी सोडण्यास रविवारपासून (१५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे.
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, दिवाळीच्या सणाला नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी मागणी महापौरांसह पालिकेतील गटनेत्यांनी गेल्या आठवडय़ामध्ये झालेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यानुसार ९ ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दररोज एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार संपूर्ण शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, आता रविवारपासून पाणीकपात लागू होत असून महापालिकेने केलेल्या वेळापत्रकानुसार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशसनाने स्पष्ट केले.
पाणीकपात लागू केल्यापासून गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये टँकरच्या मागणीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऑक्टोबरमध्ये साडेचार हजार फेऱ्या वाढल्या असून संपूर्ण महिन्यांत तब्बल १६ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Story img Loader