शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणले जातील आणि विविध उपाययोजनांद्वारे शहरातील पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वतोपरी बळकट केली जाईल, असा विश्वास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी व्यक्त केला.
पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार कृष्णा यांनी सोमवारी स्वीकारला. गेल्या महिन्यात त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पीएमपीला पूर्ण वेळाचा सनदी अधिकारी द्यावा अशी मागणी पुण्यात सातत्याने केली जात होती. त्यानुसार आता कृष्णा यांच्याकडे पीएमपीचा कार्यभार देण्यात आला आहे. कृष्णा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ च्या तुकडीतील अधिकारी असून गोंदिया आणि गडचिरोली येथे त्यांनी अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. पुणे महापलिकेतही त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. गेले वर्षभर ते नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या विविध योजना पुढेही सुरू राहतील तसेच त्या योजनांना गती देऊन पीएमपीमध्ये र्सवकष सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कृष्णा यांनी सांगितले. पीएमपीच्या ताफ्यातील ज्या गाडय़ा वापरात आहेत त्यातील नव्वद टक्के गाडय़ा मार्गावर आणल्या जातील. तसेच बस स्थानके, बस थांबे, पीएमपी आगार येथे आधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, कामातील अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क ठेवला जाईल, असे ते म्हणाले. पीएमपीच्या अधिकाधिक गाडय़ा मार्गावर धावल्या, तर ती पीएमपीसाठी गुंतवणूक ठरणार आहे. आयुर्मान उलटलेल्या आणि ज्या गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे अशा गाडय़ा वगळता उर्वरित गाडय़ांपैकी अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. बस थांबे व बस स्थानकांवर प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा मिळतील, असेही कृष्णा म्हणाले.

Story img Loader