आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे, पिंपरी- चिंचवडमधील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदारांनी ग्रामीण भागात सुरू केलेले मार्ग बंद करण्याच्या हालचाली पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मार्गांचा तोटा वाढत असल्याने प्रती किलोमीटर पंचवीस रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लांब पल्ल्याचे मार्ग बंद करण्यात येणार आहेत.

हेही वाचा- मुंबई ते अलिबाग प्रवास आता केवळ ४० मिनिटांत; मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा मंगळवारपासून होणार सुरू

मतदारांना खूष करण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांनी जिल्ह्यात लांब पल्ल्याचे मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार पीएमपीकडून तातडीने मार्ग सुरू करण्यात आले. गेल्या काही महिन्यात तब्बल ७८ मार्गांवर पीएमपीची सेवा सुरू आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अशी सेवा सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील प्रवासी सेवेवर त्याचा ताण पडत असल्याचे दिसून येत होते. त्यातच सेवा सुरू केलेल्या मार्गांवर उत्पन्न कमी आणि तोटा जास्त वाढत असल्याचे पीएमपीच्या वाहतूक विभागाला आढळून आले होते. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्चही पीएमपीला करावा लागत होता. त्यावरून प्रवासी संघटना आणि संस्थांनी लांब पल्ल्याची सेवा सुरू करण्याच्या धोरणावर टीका केली होती. त्यामुळे तोट्यााल मार्ग बंद करण्याचे पीएमपीच्या विचाराधीन आहे. तसेच गर्दीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बसमध्ये दोन वाहक नियुक्त करण्याची चाचपणी सध्या केली जात आहे. पुढील काही दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा- मध्य रेल्वेवर तीन हजार नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर; प्रवाशांची सुरक्षा होणार अधिक भक्कम

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ‘पीएमपी’च्या सध्या अंदाजे एक हजार ६०० बस मार्गावर धावतात. मात्र, गर्दीचे मार्ग आणि बसची वारंवारिता याची सांगड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या दोन्हीवर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाकडून एका बसमध्ये दोन वाहक नेमण्यावर विचार सुरू आहे.