पुणे : पीएमपीचालकांना अडथळा होईल, अशा प्रकारे रिक्षा चालविणाऱ्या आणि बसस्थानक, थांब्याच्या परिसरात येऊन बस प्रवासांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे. याशिवाय स्वारगेट पोलिसांकडून रिक्षांबरोबरच ओला, उबेर, खासगी प्रवासी अशा एकूण ५३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला विक्रम
पीएमपीची स्थानके आणि बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबविता येत नाही, असा नियम आहे. मात्र रिक्षाचालक या नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रास पीएमपीच्या मुख्य स्थानकांच्या परिसरात येऊन बस प्रवाशांची वाहतूक करतात. बसचालकांना अडथळा होईल, या प्रकारे रिक्षा चालवितात, अशा तक्रारी प्रवासी आणि प्रवासी संस्था, संघटनांनी पीएमपी प्रशासनाकडे सातत्याने केल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिला होता. त्यानुसार वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार स्थापन करण्यात आले. या पथकासोबत पीएमपीकडील चार सेवक आणि एक आरटीओ अधिकारी यांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रत्येकी एक-एक अशी दोन संयुक्त दक्षता पथके स्थापन करण्यात आली. या पथकाने गेल्या तीन महिन्यात एकूण एक हजार ६२० रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे.
हेही वाचा >>> दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?
याशिवाय स्वारगेट पोलिसांकडून स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा, ओबा, उबेर, खासगी प्रवासी गाड्या आदी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ नुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ५३० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तीन महिन्यांतील कारवाईचा तपशील
महिना दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षांची संख्या
जानेवारी ५५३
फेब्रुवारी ६२२
मार्च ४४५
एकूण १,६२०