मार्गदर्शक फलक नसलेली गाडी दाखवा आणि शंभर रुपये मिळवा, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणारा चालक दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा या दोन बक्षीस योजनांबरोबरच लाल दिवा असताना झेब्रा क्रॉसिंगवर उभी असलेली गाडी दाखवा आणि शंभर रुपये मिळवा, अशा तीन बक्षीस योजना पीएमपीतर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आल्या.
यापूर्वीही अशा योजना जाहीर करण्यात आल्या होत्या आणि त्यात जागरूक पुणेकरांना बक्षिसेही मिळाली होती. पुढे त्या योजना बंद पडल्या. सुबराव पाटील पीएमटीचे महाव्यवस्थापक असताना त्यांनी या योजना सुरू केल्या होत्या. पीएमपीने पुन्हा या योजना जाहीर केल्या आहेत. त्यांची माहिती पीएमपीचे जनता संपर्क अधिकारी दीपकसिंग परदेशी यांनी गुरुवारी दिली.
वाहतुकीला शिस्त यावी आणि परिवहन सेवेचा दर्जा वाढावा या दृष्टीने या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या पीएमपीच्या गाडीचे छायाचित्र बक्षिसासाठी द्यायचे आहे. तसेच त्या सोबत छायाचित्राची माहिती देणारा एक अर्जही भरून द्यावा लागेल. ही छायाचित्रे पीएमपीच्या मुख्यालयातील जनता संपर्क कार्यालयात सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत द्यायची आहेत. चौकामध्ये लाल दिवा लागलेला असताना जर पीएमपीची गाडी झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली असेल, तर अशा गाडीचे छायाचित्र पाठवल्यास शंभर रुपये बक्षीस दिले जाईल. तसेच पीएमपीचा चालक गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असेल व अशा चालकाचे छायाचित्र काढल्यास अशा छायाचित्रकाराला एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
पीएमपीच्या पुढील भागात मार्ग दर्शवणारा फलक नसेल, तर अशा गाडीचे छायाचित्र काढल्यास तेही बक्षीसपात्र ठरणार असून या तिन्ही बक्षीस योजनांसाठी छायाचित्राची स्थळप्रत सादर करावी लागणार आहे.

Story img Loader