पुणे : आयुर्मान संपल्यानंतरही ३२७ पीएमपी बस अजूनही वापरात आहेत. मोडकळीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असूनही या बस रस्त्यावर धावत असल्याने अपघातांचा गंभीर धोका असल्याचा आरोप सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या बस अद्याप आलेल्या नसल्याने या जुन्या बस अजूनही काही काळ वापराव्या लागणार असल्याचे ‘पीएमपी’तील सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील कुर्ला येथे ‘बेस्ट’ बसच्या अपघातामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या बसची दुरुस्ती, चालकांचे प्रशिक्षण असे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी बसबाबत माहिती घेतली असता, पीएमपीकडून खासगी तत्त्वावर ‘सीएनजी’ इंधनावरील ४०० बससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्या महिन्या-दोन महिन्यात ताफ्यात येणे अपेक्षित असून, त्या येताच जुन्या ३२७ बस मोडीत काढण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण ‘पीएमपी’कडून देण्यात आले.
हेही वाचा – द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
u
‘पीएमपी’च्या ताफ्यात स्व-मालकीच्या एकूण १,९५० बस आहेत. त्यापैकी १००४ बस ‘पीएमपी’च्या असून उर्वरित खासगी कंत्राटदार तत्त्वावरील आहेत. नियमानुसार, बारा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या किंवा आठ लाख ४० हजार किलोमीटर अंतर पार केलेल्या बस मोडीत काढणे बंधनकारक आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात अशा ३२७ बसची आहेत. त्यांचे आयुर्मान संपूनदेखील त्या वापरात आहेत.
शहर-उपनगरांतील विविध रस्त्यांवर या बस मार्गक्रमण करतात. त्यातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी मोडकळीस आलेल्या बसमधील प्रवास गैरसोयीचा आणि धोक्याचादेखील आहे. अचानक बस बंद पडणे, त्यामुळे वेळापत्रक कोलमडणे अशा घटना तर सातत्याने घडत आहेत. तसेच, आयुर्मान संपल्याने देखभाल-दुरुस्तीवरही मोठा खर्च करावा लागत आहे.
याबाबत ‘पीएमपी’चे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘पीएमपीने पर्यावरणपूरक आणि व्यावसायिकदृष्ट्या परवडणाऱ्या ‘सीएनजी’ इंधनावर आधारित बस सेवेत घेण्याचे नियोजन केले आहे. आयुर्मान ओलांडलेल्या ३२७ बस मोडीत काढण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, नवीन बस खासगी तत्त्वावर घेण्यात येणार असल्याने निविदा प्रक्रिया पार पाडणे महत्त्वाचे होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीसा विलंब झाला. उर्वरित कराराची प्रक्रिया पूर्ण करून नवीन वर्षाच्या सुरुवातील ४०० खासगी बस सेवेत येतील.’
- ‘पीएमपी’च्या स्व-मालकीच्या एकूण बस : १००४
- खासगी तत्त्वावरील (कंत्राटी) बस : ९५०
- आयुर्मान संपलेल्या बस : ३२७
- नव्याने सेवेत घेतल्या जाणाऱ्या बस : ४००
‘पीएमपी’च्या सेवेत असलेल्या कोणत्याच बसची नियमित देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. ज्या बसचे आयुर्मान संपले आहे, त्या बस नियमानुसार मोडीत काढल्या पाहिजेत. बस अचानक रस्त्यात बंद पडत असून, वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत पीएमपी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. – जुगल राठी, पीएमपी प्रवासी मंच
हेही वाचा – बालाजीनगर मेट्रो स्थानकामुळे अंतरात बदल ? किती अंतरावर असणार स्थानके ?
नवीन बस लवकरच सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. करार, कागदपत्रे आणि इतर नियोजन पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नववर्षाच्या सुरुवातीपर्यंत आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढल्या जातील. – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी