पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी चांगलं वृत्त आहे. पीएमपी बसमधील डावी बाजू ही महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व सुरक्षित व्हावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अनेकदा पुरुष प्रवासी नियम न पाळता महिलांशी हुज्जत घालण्याची शक्यता असते. त्यामुळे राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाने महिलेसाठी जागेवरुन उठायला नकार दिल्यास बस थेट पाेलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे आदेश पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.  तसेच कारवाईसाठी बस चौकीत नेल्याबाबतचा मेसेज संबंधीत कर्मचाऱ्याने पीएमपीच्या अपघात विभागास देण्यासंदर्भातही सांगण्यात आले आहे. या सूचनांचे उल्ल्ंघन केल्यास कर्मचाऱ्यांविराेधात प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

बसमध्ये अनेकदा महिलांच्या राखीव जागेवरुन पुरूष प्रवासी उठण्यास नकार देतात व हुज्जत घालतात. त्यामुळे आता महिलांना जागा मिळवून देण्यासाठी पीएमपी कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करण्यास कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तरीही पुरुषाने जागा न दिल्यास पीएमपी कर्मचाऱ्यांनी बस थेट नजिकच्या पाेलीस चाैकीमध्ये घेऊन जावी असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून देण्यात आले आहेत.