पुणे : नव्याने शंभर गाड्यांची खरेदी करण्यासंदर्भातील निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत न झाल्याने बसखरेदीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यापूर्वी आचारसंहितेमुळे बसखरेदीला उशीर झाला होता. मात्र, त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत केवळ चर्चा झाल्याने प्रवाशांना नव्या गाड्यांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि ठेकेदारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पीएमपीकडून शंभर गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव संचालक मंडळाने यापूर्वीच मान्य केला आहे. या शंभर गाड्यांमध्ये २० डबल डेकर आणि १२ मीटर लांबीच्या ८० गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या वातानुकुलित आहेत. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढल्याने विनावातानुकुलित गाड्या घेण्याचा सुधारित प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, चार दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे बसखरेदीचा निर्णय लांबणीवर पडला असून, प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख वाढला
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सीएनजीवर धावणाऱ्या १०० गाड्या घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्याचबरोबर २०० गाड्या भाडेकराराने घेण्याचे नियोजित आहे. मात्र, ही प्रक्रियाही रखडली आहे. शहरातील वाहतुकीचा विचार करता प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० गाड्या असणे आवश्यक आहे. पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार १४२ गाड्या असून, त्यांपैकी एक हजार ४०० गाड्या दैनंदिन संचलनात असतात. त्यामुळे एक लाख लोकसंख्येसाठी ५० गाड्या ही मागणी पूर्ण करण्यासाठी तीन हजार ५०० गाड्यांची आवश्यकता आहे.
© The Indian Express (P) Ltd