पुणे : पीएमपीच्या बसथांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पीएमपी प्रशानसाने घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी प्रवाशांसाठी बसथांब्यांवर निवारा उभारण्यात आला आहे. त्यावर वाढदिवसाचे फलक, राजकीय जाहिराती आणि अन्य छोट्या जाहिराती अनधिकृतपणे लावण्यात येत आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत आहे.
अनधिकृत जाहिरातींमुळे बस थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेले बसमार्ग आणि वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना समजत नाही. त्यामुळे, प्रवाशांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन बस थांब्यांवर आणि बस गाड्यांवर अनधिकृत जाहिराती लावण्यात येऊ नयेत, असे आवाहन पीएमपीने केले आहे.
पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अनधिकृत जाहिरात लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील विविध पोलीस ठाण्यांत अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.