पीएमपीच्या एका संचालकपदासाठीची निवडणूक १६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी ही माहिती दिली. महापालिकेत सत्ताधारी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढविणार असून त्यासाठी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख पीएमपीच्या संचालकपदावर निवडून गेले होते. महापालिकेच्या १५२ सदस्यांमधून पीएमपी संचालकपदावर एक नगरसेवक निवडून जातो. देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे त्यांचे पीएमपीचे संचालकपदही आपोआप रद्द झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या संचालकपदासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे पीएमपीने महापालिकेला कळविले आहे. तसे पत्र सोमवारी (२ नोव्हेंबर) महापालिकेला देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपीच्या संचालकपदासाठी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पािठबा न दिल्यामुळे  निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि शिवसेनेचे देशमुख विजयी झाले होते. मात्र, महापालिकेच्या स्थायी समितीचे शेवटच्या वर्षांतील अध्यक्षपद राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या निवडणुकीत काँग्रेसची साथ राष्ट्रवादीला मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे.
पीएमपी सक्षम करण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. त्यामुळे पीएमपीवर वर्चस्व ठेवण्यासाठी संचालकपदाच्या निवडणुकीत अनुभवी उमेदवार द्यावा, असे धोरण राष्ट्रवादीने ठरवले आहे. त्यासाठी गेल्या वेळेचे उमेदवार सुभाष जगताप तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे आणि नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या नावांचा विचार पक्षात सुरू आहे.
पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरातील सुमारे बारा लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यामध्ये दरवर्षी दोनशे गाडय़ांची भर घालण्याचे पक्षाने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यानुसार सध्या पाचशे गाडय़ांच्या खरेदीची प्रक्रिया पीएमपीमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एका जर्मन कंपनीने पुढाकार घेतला आहे. तसेच पीएमपीच्या सर्व बसगाडय़ांना जीपीएस बसविण्याचा ठरावही मंजूर झाला आहे. पीएमपीच्या मालमत्तांना अडीच एफएसआय मिळावा म्हणून महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने पुणे व पिंपरी या दोन्ही शहरांमधील नागरिकांसाठी पीएमपीची सेवा महत्त्वाची असल्यामुळे पीएमपीच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचाच सदस्य असावा, असे प्रयत्न पक्षातर्फे करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा