शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपी वाहनचालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. तर, उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.
पीएमपीएमएलच्या वाहनचालकांसाठी डॉ. तोडकर हॉस्पिटल आणि नोव्हा ग्रुपतर्फे १० फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत सर्वेक्षण घेण्यात आले. माजी संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. पूर्ण महिनाभर चाललेल्या या सर्वेक्षणामध्ये ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या १६७० बसचालकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी १३१२ चालकांच्या आरोग्य समस्या, जुनाट दुखणी जाणून घेण्यासाठी विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील शर्करा, मेदाचे प्रमाण, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब आणि चयापचय वयोमान या परिमाणांचा आधार घेण्यात आला, अशी माहिती डॉ. जयश्री तोडकर यांनी शुक्रवारी दिली. तोडकर हॉस्पिटलचे प्रमुख आणि माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर, नोव्हा ग्रुपचे डॉ. आशिष बॅनर्जी आणि पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी दीपकसिंह परदेशी या वेळी उपस्थित होते.
१३२१ चालकांपैकी ४५ टक्के चालक स्थूल होते. त्यांचा बॉडी मास इंडेक्स ३० किंवा त्याहून जास्त होता आणि १७ टक्के चालकांचा बॉडी मास इंडेक्स हा ४० हून अधिक म्हणजे धोक्याच्या सीमेवर होता. या चालकांना उच्च रक्तदाब आणि ताणाचा त्रास असल्याने वारंवार आजारपण येते हे सर्वेक्षणातून दिसून आले. यातून हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या उद्भवून अकाली मृत्यूही येऊ शकतो. २७ टक्के चालकांच्या चयापचय संस्थेचे वयोमान अस्वाभाविक असल्याचे आणि त्याची परिणती म्हणून अकाली वृद्धत्वाकडे वाटचाल होत आहे. ४१ ते ४५ वर्षे वयोगटातील ६२५ चालकांपैकी काहींनी आपल्याला होत असलेल्या विकाराची माहिती प्रारंभीच दिली होती. हृदयविकाराचे प्रमाण ३.८ टक्के, ताण-थकवा १६.३ टक्के, मधुमेह १० टक्के, तर उच्च रक्तदाबाचे प्रमाण ९ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, तपासणीअंती २७ टक्के चालकांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या चालकांपैकी निम्म्याहून अधिक चालक धूम्रपान करणारे आहेत. तसेच तंबाखू, गुटखा आणि मद्यसेवन करीत असल्याचे दिसून आले आहे. ताणापासून मुक्त होण्यासाठी ते व्यसनांचा आधार घेत असले तरी त्यामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि पक्षाघाताची शक्यता बळावते. या सर्वेक्षणातील निष्कर्ष हे प्रश्नोत्तराच्या सत्रांमधून आणि चालकांच्या वैद्यकीय तपासण्यांमधून काढण्यात आले आहेत, असे डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितले. अधिक तपासणीची आवश्यकता असलेल्या चालकांवर कमला नेहरू रुग्णालय आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार असल्याचे दीपकसिंह परदेशी यांनी सांगितले.
पीएमपीचे ४५ टक्के वाहनचालक लठ्ठ
शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपी वाहनचालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. तर, उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.
First published on: 11-04-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp driver fat blood pressure