पिंपरी: पुण्यात पीएमपी बस चालक मोबाईलवर चित्रपट बघत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड च्या निगडी पीएमपी आगारातील चालकाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मोबाईल वरील चित्रपट बघत पीएमपी चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येत आहेत. अद्याप या पीएमपी चालकाचे नाव समजू शकलेले नाही.
आणखी वाचा- पुणे : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा; ५० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ
पीएमपी आणि प्रवाशी यांचं पुण्यात काही वेगळंच नात आहे. पीएमपी चालक आणि प्रवाशी यांच्यातील भांडणाचे, बाचाबाची अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. दरम्यान, निगडी येथील पीएमपी चालकाने मोबाईलवर चित्रपट पाहात बस चालत प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. अशा चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे पीएमपी बस प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरात पीएमपी चालक वाहन नियमांचे पालन करत नसल्याचं देखील अनेक वेळा समोर आले आहे.
अनेकदा, पीएमपी चालक आणि प्रवाशी यांच्यातील भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही महिन्यांपूर्वी पीएमपी चालकाने बस न थांबविल्याने एका प्रवाशाने आरडाओरडा करत चालकाला शिवीगाळ केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. याविषयी पीएमपी चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.