संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पीएमपीच्या वतीने आळंदी आणि देहूसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांसाठी एकूण १५२ गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शनिवारपासून (१८ जून) बुधवारपर्यंत (२२ जून) जादा गाड्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून सुटणार आहेत.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी पीएमपीकडून मार्गावरील नियमित गाड्यांव्यतिरिक्त जादा गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यावेळीही तसे नियोजन करण्यात आले आहे.

आळंदीसाठी स्वारगेट, महापालिका भवन, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणाहून एकूण १३० गाड्या सोडण्यात येतील. तर देहूसाठी पुणे रेल्वे स्थानक, महापालिक भवन, निगडी या ठिकाणाहून २२ जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, देहू ते आळंदी या मार्गावर दहा स्वतंत्र गाड्या संचालनात असतील. देहू आणि आळंदी येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकता वाटल्यास आणखी काही गाड्या सोडण्यात येतील.

पुण्यातून पालखी प्रस्थान झाल्यानंतर हडपसर येथे पुढील शुक्रवारी (२४ जून) पालख्या दर्शानासाठी थांबणार आहेत. त्यामुळे महात्मा गांधी स्थानक येथून पुणे रेल्वे स्थानक, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कात्रज आणि कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून मुंढवा, चंदननगर आणि वाघोलीसाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.

Story img Loader