पीएमपी प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी पीएमपीचा ताफा वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असला, तरी ताफा सतत वाढत असूनही पीएमपीची प्रवासी संख्या मात्र कमी होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गाडय़ांचा ताफा वाढवून प्रवासी संख्या वाढत नाही हे वास्तव प्रशासन विचारात घेणार का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरीतील सुमारे आठ ते दहा लाख प्रवाशांना पीएमपीतर्फे सेवा दिली जाते. ही सेवा कार्यक्षम करायची असेल, तर जास्तीतजास्त गाडय़ा मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट नेहमी ठेवले गेले आहे. पीएमपीच्या ताफ्यात आणखी बाराशे गाडय़ा आणण्याचा निर्णय नुकताच झाला असून त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवाशांना चांगली सेवा देता येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयाबाबत शंका उपस्थित केली असून गाडय़ा वाढवून प्रवाशांना चांगली सेवा मिळत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या बरोबरच गाडय़ांचा ताफा वाढवला, तरी प्रवासी संख्या मात्र वाढत नसल्याचाही मुद्दा मांडण्यात आला आहे.
गाडय़ा वाढूनही प्रवासी संख्या वाढत नसल्याची कारणे सांगताना पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, की पीएमपीने केलेली भाडेवाढ आणि सेवेतील कार्यक्षमतेचा अभाव ही प्रवासी कमी होत असल्याची मुख्य कारणे आहेत. पीएमपीची सेवा कार्यक्षम आणि भरवंशाची असेल असे सांगितले जात असले, तरी प्रवाशांना मात्र तसा अनुभव येत नाही. मार्गाचे सुसूत्रीकरण केले जाईल अशी घोषणा गेली अनेक वर्षे केली जात असली, तरी त्याचा विचार झालेला नाही. प्रत्यक्षातील अनुभव असा येतो, की एकाच मार्गावर लागोपाठ गाडय़ा धावत असतात आणि त्या पाच-पाच गाडय़ा पाठोपाठ गेल्या की नंतर कितीतरी वेळ गाडीच येत नाही असा प्रकार आहे.
प्रवाशांच्या गरजा नेमक्या काय आहेत, कोणत्या मार्गावर गाडय़ांची आवश्यकता आहे, त्यांच्या वेळा काय, पासची किंमत नक्की किती ठेवली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत नाही उलट ती कमी होत आहे, असेही राठी यांनी सांगितले. उत्पन्नाकडे लक्ष नाही आणि फक्त खर्चकेंद्रित योजना आणायच्या आणि त्या प्रवाशांच्या नावाखाली खपवायच्या असा प्रकार सुरू असल्यामुळे कार्यक्षम सेवा मिळत नाही, असेही ते म्हणाले.
—
सन २००८-०९ मध्ये पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या १० लाख ७१ हजार होती. त्या वेळी ताफ्यात १,४०९ गाडय़ा होत्या. त्या वेळी प्रतिगाडी प्रवासी संख्या १,०२४ एवढी होती. सन २०१५-१६ मध्ये दैनंदिन प्रवाशांची संख्या १० लाख ७६ हजार आहे आणि ताफ्यात २,०४७ गाडय़ा आहेत. या वर्षांत प्रतिगाडी प्रवासी संख्या ७२७ इतकी आहे. पीएमपी पासधारकांची संख्याही कमी होत असून सन २००८-०९ मध्ये ती दोन लाख ६३ हजार इतकी होती ती आता दोन लाख ३३ हजार आहे.
—
दाट लोकवस्तीच्या भागात प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर पीएमपीने ताफ्यात छोटय़ा गाडय़ा (मिनी बस) आणणे आवश्यक आहे. मात्र कमी आसनक्षमतेच्या गाडय़ा न आणता भाडे तत्त्वावरील गाडय़ांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. प्रत्यक्षात ठेकेदाराच्या कामावर पीएमपीचे नियंत्रण नाही, नियमनही नाही. तरीही त्याच गाडय़ांची संख्या वाढत आहे.
जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा