पुणे : आदेश देऊनही कार्यालयीन कारभारात मराठी भाषेचा पूर्णतः अवलंब केला जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्रक काढावे लागल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पीएमपीच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज मराठीतूनच करावे असे अधोरेखीत केले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी आणि निमसरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून कामकाज अनिवार्य केले आहे. तसेच सरकारी कार्यालयांमधील व्यवहार, बोलणे हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजे, असे पत्रक चार फेब्रुवारीराजी काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पीएमपी प्रशासनामध्ये अनेक विविध विभागांतर्गत होणारे पत्रव्यवहार, नमुना पत्रके, शेरे, अभिप्राय, टिपण्या, विभागीय नियमन पुस्तिका, नमुना पत्रके, प्रारूप पत्रके, आदेश, अधिसूचना, करारनामे, अहवाल तसेच बैठकांचे इतिवृत्त आदी माहिती मराठीत करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र, त्यानंतरही अनेकदा कार्यालयीन कामकाजांतून मराठीचा अवलंब केला जात नसल्याचे समोर आले.
त्यामुळे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा परिपत्रक काढून सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुनःश्च कळविण्यात येते की अशा आशयाचे पत्रक काढून मराठीचा अवलंब करावा असे आदेश दिले आहेत. कार्यालयातील नामफलक, तसेच इंग्रजी भाषांचे नामा्ंतर असलेल्या पाट्या, इतर व्यवहार, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरीकांसोबतही मराठीतून व्यवहार करावा, अशी आठवण नार्वेकर यांनी पत्रक काढून करून दिली आहे.
कार्यालयांमधील कामकाज मराठीत करण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सूचना देण्यासाठी परिपत्रक काढले आहे.
नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी