‘पीएमपी’पुढे वाढत्या अडचणी आहेत, त्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पीएमपीचा सध्याचा तोटा कमी करावा लागणार असून मोठय़ा प्रमाणात नादुरूस्त असलेल्या बस मार्गावर आणण्याचा प्रयत्नही सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यपध्दती सुधारावी लागेल आणि पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची गरज आहे, असे मत पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जाधव यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या कारभाराविषयी सर्वच स्तरातून टीका होत आहे. पिंपरी पालिकेतील नगरसेवकांनी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेची मागणी केली आहे. यासंदर्भात, जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, की पीएमपीचा कारभार सुधारला पाहिजे. संस्था तोटय़ात आहे, तो तोटा कमी करावा लागेल. तिकीट दरात वाढ, मालमत्ता तसेच जाहिरात हे तीन मार्ग उत्पन्नवाढीसाठी आहेत, अन्य पर्यायांचाही विचार करावा लागणार आहे. पीएमपी महत्त्वाची प्रवासी सेवा असून लाखो प्रवासी त्यावर अवलंबून आहेत. वास्तविक वाहतूक सेवा कधीही फायद्यात नसते, याचाही विचार झाला पाहिजे. सद्य:स्थितीत ६०० बस नादुरूस्त आहेत. त्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून जास्तीत जास्त बस मार्गावर आणण्याचा प्रयत्न आहे. पीएमपीच्या विभाजनाचा प्रस्ताव सभेपुढे येईल, तेव्हा निर्णय होईल. सदस्यांच्या विधायक सूचनांचा निश्चितपणे विचार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरभरात रविवारी स्वच्छता अभियान
पिंपरी पालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १६ नोव्हेंबरला सकाळी सातपासून दहापर्यंत शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्यात येणार आहे. शहरातील सहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी अभियान सुरू होईल, त्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.

Story img Loader