कामावर असतानाही काम न करणाऱ्या पीएमपीच्या सेवकांवरील कारवाईनंतर आता अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरू झाली आहे. कामात गंभीर कसूर केल्याबद्दल तसेच मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याबद्दल दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली असून पीएमपीमध्ये अनेक वर्षांनंतर अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे.
पीएमपीच्या यंत्रशाळांमध्ये नियुक्त असलेले सेवक कामावर आहेत का नाहीत तसेच सेवेत असलेले सेवक काय काम करत आहेत, याची अचानक तपासणी झाल्यानंतर सेवकांचे अनेक गैरप्रकार उजेडात आले होते. पीएमपीच्या नेहरूनगर, हडपसर आणि शिवाजीनगर या तीन डेपोंमध्ये तसेच स्वारगेट येथील मध्यवर्ती यंत्रशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत दोषी आढळलेल्या एकशे चार सेवकांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस गेल्या आठवडय़ात देण्यात आली होती. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्याही चौकशीचे काम सुरू झाले असून त्यात काही अधिकाऱ्यांनी पीएमपीचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचे दिसून आले आहे.
पीएमपी सेवा कार्यक्षम करणे आणि काटकसर या दोन पद्धतीने डॉ. परदेशी यांनी काम सुरू केले असून त्यानुसार बंद गाडय़ा मार्गावर का येत नव्हत्या, याची चौकशी त्यांनी सुरू केली आहे. डिसेंबर महिन्यात दिनांक १४ रोजी पीएमपीची मालकी असलेल्या १,२५० गाडय़ांपैकी ७०० गाडय़ा वेगवेगळ्या डेपोंमध्ये बंद अवस्थेत होत्या आणि फक्त ५५० गाडय़ा मार्गावर होत्या. तसेच देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण ताफ्यातील २० टक्के गाडय़ा पाठवणे आवश्यक असताना तसे न करता त्या पूर्ण बंद अवस्थेत असल्याचेही दिसून आले होते.
मुख्य अभियंता आणि भांडार अधिकारी यांनी किमान ८० टक्के सक्षम गाडय़ांचा ताफा मार्गावर आणणे आवश्यक असताना त्यांनी गाडय़ांचा ताफा उपलब्ध करून दिला नसल्याचेही चौकशीत आढळले आहे. मुख्य अभियंत्याच्या नियंत्रणाखाली मध्यवर्ती कार्यशाळा व अन्य १० कार्यशाळा आहेत. या डेपोंमध्ये गाडय़ांची दैनंदिन देखभाल-दुरुस्ती आवश्यक असताना ते काम होत नव्हते. तसेच भांडार अधिकाऱ्याकडे सुटे भाग खरेदी करून त्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी होती. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात कसूर केल्याचे दिसले आहे.
पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला अर्थसाहाय्य होते. देखभाल-दुरुस्तीची परिस्थिती पाहता पीएमपीच्या गाडय़ा मार्गावर येऊ शकलेल्या नाहीत. कार्यशाळा व भांडार विभागासाठी दरमहा एक कोटी ७९ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध होत होता. तरीही देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे बंद गाडय़ांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रवाशांची गैरसोय, पीएमपीचे नुकसान
दैनंदिन देखभाल दुरुस्ती न करणे, सुटय़ा भागांचे नियोजन न करणे आणि कर्तव्यातील निष्काळजीपणा यामुळे मार्गावरील मंडळाच्या गाडय़ांचा ताफा निकषाप्रमाणे संचलनात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि वाहतुकीचे उत्पन्न न मिळाल्यामुळे मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा निष्कर्ष काढण्यात आला असून पीएमपीचे मुख्य अभियंता आणि भांडार अधिकारी या दोघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.

Story img Loader