पुण्याची पीएमटी आणि पिंपरीची पीसीएमटी यांचे विलीनीकरण करून ‘पीएमपी’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, ही कंपनी म्हणजे पुढच्या दाराने पीएमपी आणि मागच्या दाराने पीएमटी-पीसीएमटी असाच कारभार गेली सात वर्षे सुरू होता. त्यामुळे व्हायचे तेच झाले आणि विलीनीकरणाच्या या दिखाऊपणाला वैतागलेल्या लोकप्रतिनिधींनी अखेर ‘पीएमपी’ बरखास्त करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.
पुणे महानगर परिवहन (पीएमपी) ही स्वतंत्र कंपनी जुलै २००७ मध्ये स्थापन झाल्यानंतर या कंपनीचा संपूर्ण कारभार एकत्रितपणे चालवला जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पीएमपी ही कंपनी नामधारी राहिली आणि पीएमटी व पीसीएमटीचा कारभार पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे चालू राहिला. दोन वाहतूक संस्था एकत्र करून ही नवी कंपनी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे विलीनीकरणानंतर त्या वाहतूक संस्थांचे अस्तित्व संपवणे आवश्यक होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.
पीएमपी या एकाच कंपनीत पीएमटी व पीसीएमटी या दोन वाहतूक संस्था स्वतंत्र रीतीने कशा काम करत होत्या त्याची ही काही उदाहरणे.

पीएमपीची स्थापना झाल्यानंतरही कामगारांना समान वागणूक मिळालीच नाही. पूर्व पीसीएमटीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस आणि पूर्व पीएमटीतील कर्मचाऱ्यांचा बोनस यात दरवर्षी किमान तीन हजार रुपयांचा फरक राहिला. गेली सहा वर्षे पुण्यापेक्षा पिंपरीत तीन हजारांनी अधिक बोनस दिला गेला.

विलिनीकरणानंतर पीएमटीकडील तसेच पीसीएमटीकडील सर्व बसथांबे आदी मालमत्ता नव्या कंपनीकडे हस्तांतरित करणे कंपनी कायद्याने बंधनकारक होते. प्रत्यक्षात ही कार्यवाही फक्त पुणे महापालिकेनेच केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही प्रक्रिया केलीच नाही.

पीएमटीच्या ताब्यातील मोकळे भूखंड, इमारती, डेपोंचेही हस्तांतरण कंपनीकडे होणे गरजेचे होते. ती प्रक्रिया पीएमटीने पार पाडली. पीसीएमटीने ही प्रक्रिया पार पाडली नाहीच, उलट विलीनीकरणापूर्वी पीसीएमटीकडील काही भूखंड पिंपरी महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतले.

विलीनीकरणानंतर दोन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी समान सेवा नियमावली असणे आवश्यक होते. तसे न करता पूर्व पीएमटीतील कर्मचाऱ्यांसाठी एक नियम आणि पूर्व पीसीएमटीतील कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम असा प्रकार गेली सात वर्षे सुरू राहिला.

विलीनीकरणानंतर पीसीएमटीतील सर्व हंगामी सेवकांना कायम सेवेत घेण्यात आले. पीएमटीमधील हंगामी सेवक मात्र अद्यापही हंगामी सेवक म्हणूनच काम करत आहेत.

पीएमपी ही स्वतंत्र कंपनी स्थापन होऊनही पूर्वीप्रमाणेच आर्थिक व्यवहार स्वतंत्र रीत्या चालवले जात होते.

Story img Loader