पीएमपी प्रशासनाने स्वत:च्या मालकीची स्वारगेट येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला बेकायदेशीर रीत्या दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कामगार संघटनांमध्ये अकारण वाद उत्पन्न करण्याचा हा प्रयत्न असून जागा वाटप नियमावली धुडकावून ही जागा नाममात्र एक रुपया दराने देण्याचा प्रकार कायद्याला धरून नाही, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.
पीएमपीच्या संचालक मंडळाने पीएमपीमधील राष्ट्रवादी कामगार संघटनेला स्वारगेट येथील एक जागा कार्यालयासाठी देण्याचा ठराव गेल्या महिन्यात संमत केला. या संघटनेला मान्यता नसतानाही केवळ एक रुपया दराने भाडे तत्त्वावर ही जागा देण्याचा निर्णय बेकायदेशीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी मंगळवारी केली. तसे निवेदनही त्यांनी प्रशासनाला दिले आहे. जागा भाडे तत्त्वावर देताना ती प्रचलित बाजारमूल्यानुसारच दिली गेली पाहिजे, असे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने जागावाटप नियमावली तयार केली असून कोणत्याही जागा संस्थांना वा व्यावसायिक कारणासाठी देताना जागावाटप नियमावलीनुसारच त्या दिल्या जातात, याकडे बालगुडे यांनी लक्ष वेधले आहे.
जागा वाटप नियमावलीकडे डोळेझाक करून ही जागा देण्यात आली आहे. तसेच मान्यता नसलेल्या संघटनेला जागा दिल्यामुळे अशाच प्रकारच्या इतर संघटनाही जागांची मागणी करतील, त्या वेळी काय निर्णय घेणार, त्यांनाही जागा देणार का, अशीही विचारणा बालगुडे यांनी केली आहे. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करू नये आणि प्रशासनाने लाचार होऊन कोणाच्या दबावाखाली काम करू नये, अशीही मागणी बालगुडे यांनी केली आहे.
पीएमपीमध्ये इंटक ही कामगारांची मान्यताप्राप्त संघटना असून या संघटनेनेही जागावाटपाला आक्षेप घेतला आहे. हा निर्णय रद्द झाला नाही, तर न्यायालयातही दाद मागितली जाईल, असे सांगण्यात आले. पीएमपीच्या अध्यक्षांना आणि व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्रही देण्यात आले आहे.

Story img Loader