संचालक मंडळाने दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतरही पुन्हा एकदा पीएमपी प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला असून या प्रस्तावात दाखवण्यात आलेले भरमसाठ तोटय़ाचे आकडे धादांत खोटे आणि फुगवलेले असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचने केला आहे.
पीएमपी तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात संचालक मंडळाने पूर्णत: फेटाळला होता. तोच प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा संचालक मंडळापुढे ठेवला असून संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (२७ जून) बोलावण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने मांडलेला हा प्रस्ताव पंचवीस टक्के भाडेवाढीचा आहे. भाडेदरात काही महिन्यांपूर्वीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा दरवाढ करणे योग्य ठरणार नाही, असा सूर संचालक मंडळाच्या बैठकीत उमटला होता.
दरवाढीच्या पुन्हा मांडल्या गेलेल्या या प्रस्तावाला पीएमपी प्रवासी मंचने तीव्र विरोध केला असून दरवाढीच्या समर्थनार्थ देण्यात आलेली आकडेवारी खोटी असल्याचे निवेदन पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी दिले आहे. पीएमपीला सध्या रोज ५४ लाख रुपये तोटा असल्याचे या प्रस्तावात म्हटले असले, तरी ही आकडेवारी पूर्णत: खोटी असल्याचे प्रवासी मंचचे म्हणणे आहे. पीएमपीच्या आतापर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची आणि सर्व भाडेवाढ प्रस्तावांचीच चौकशी होणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रशासनाच्या कोणत्याही भाडेवाढीच्या प्रस्तावावर विचार करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पीएमपीची प्रवासीसंख्या सातत्याने घटत असून प्रवासी भारमान एक हजारावरून सातशे ते साडेसातशेवर आले आहे. प्रशासनाची अकार्यक्षमता, नाकर्तेपणा आणि भोंगळ कारभारामुळेच प्रवासीसंख्या कमी होत आहे. तसेच सात वर्षांत आठवेळा केलेली भाडेवाढ हेही प्रवासीसंख्या घटण्याचे कारण आहे. पीएमपीची प्रवासीसंख्या कमी होत असून याच काळात खासगी वाहनांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक झाली आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दरवाढ न करता पुणे व पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना पीएमपीने दिलासा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा