पीएमपी ही वाहतूक कंपनी बरखास्त करून पीएमटी व पीसीएमटी वेगळी करावी, या निर्णयाला कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला असून कंपनी स्थापन झाल्यानंतर पीएमटीच्या कामगारांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे.
पुणे आणि पिंपरीसाठी पूर्वीप्रमाणेच पीएमटी व पीसीएमटी या दोन स्वतंत्र वाहतूक संस्था सुरू कराव्यात, असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी एकमताने घेण्यात आल्यानंतर या निर्णयाला कामगारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. पूर्वीप्रमाणेच पीएमटी चालवण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारीत स्वतंत्र समिती स्थापन करावी अशी सूचनाही कामगारांनी केली आहे. कंपनी स्थापन झाल्यानंतर कामगारांना सुविधा मिळतील, प्रलंबित प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रश्न तर सोडवले गेले नाहीतच, उलट ज्या सुविधा दिल्या जात होत्या, त्यांच्यावरही टाच आणली गेली, अशी कामगारांची तक्रार आहे.
पीएमपीची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत गेली याचे कारण दोन्ही महापालिकांकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान, डिझेल व सुटय़ा भागांची दरवाढ, वेतनवाढ असे दिले जाते. प्रत्यक्षात कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नियोजनशून्य कारभार आणि हलगर्जीपणा हे कंपनी तोटय़ात जाण्याचे कारण आहे. कामगारांच्या हिताचा कोणताही निर्णय कंपनीने केला नाही, अशी टीका महाराष्ट्र कामगार मंचचे दिलीप मोहिते यांनी केली आहे.
पीएमपी कामगार संघाचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे म्हणाले की, कंपनीच्या स्थापनेपासून गेल्या सहा वर्षांत कंपनी कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकलेली नाही. पूर्वीचा पीएमटीचा तोटा वाढत होता म्हणून नवी कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, कंपनीच्याही तोटय़ात वाढच होत आहे. कामगारांचेही प्रश्न प्रलंबितच आहेत. त्यामुळे विभाजनाचा निर्णय योग्य आहे, असेही ते म्हणाले. शिक्षण मंडळासाठी स्वतंत्र समिती न करता पालिकेच्याच अखत्यारित जशी समिती स्थापन होणार आहे, तशीच समिती पीएमटीसाठी स्थापन करून त्या समितीमार्फत कारभार चालवावा, अशीही सूचना खराडे यांनी केली आहे. 

Story img Loader