पीएमपीच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. श्रीकर परदेशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी पालिका स्थायी समितीने मंगळवारी पीएमपीला २४ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. डॉ. परदेशी चांगले काम करत असल्याचे सांगत स्थायी समितीचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी याबाबतचा प्रस्ताव आयत्या वेळी आणून मंजूरही केला.
महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात सोमवारी नगरसेवकांची बैठक झाली, तेव्हा पीएमपीला सहकार्य करण्याचे आवाहन परदेशी यांनी केले होते. तेव्हा आमदार लांडगे तसेच पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी पीएमपीविषयीच्या तक्रारी परदेशी यांच्यापुढे मांडल्या होत्या. तथापि, आयुक्त राजीव जाधव यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पीएमपीला दोन टप्प्यात २४ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ऐन वेळी सादर करण्यात आला. परदेशी यांची पीएमपी सुधारण्याविषयीची तळमळ लक्षात घेता व त्यांचे चांगले काम पाहता ही मदत करण्याचा व यापुढेही अशीच भूमिका ठेवण्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, पिंपरी-चिंचवड परिसरातील बीआरटीस बससेवा करण्याकरिता आयटीएमएस यंत्रणा विकसित करण्यासाठी पीएमपीला २४ कोटी रुपये देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
 कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
अधिकारी काम करत नाही, वेगवेगळी कारणे देत कामचुकारपणा करतात, अशा तक्रारी गेल्या सभेत सदस्यांनी केल्या. तेव्हा शांताराम भालेकर अध्यक्षस्थानी होते. शहर अभियंता महावीर कांबळे यांना अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे व तशा आशयाचे पत्र देण्याचे आदेश समितीने दिले होते. तथापि, मंगळवारी यापैकी काहीच झाले नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा कामचुकार अधिकाऱ्यांवर टाळाटाळ न करण्याची आग्रही मागणी मागणी महेश लांडगे व भालेकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा