पुणे : पादचारी दिनानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून सोमवारी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दर तीस मिनिटांच्या वारंवारितेने या गाड्या धावणार असून लक्ष्मी रस्त्यावरील गाड्यांच्या संचलनात बदल करण्यात आला आहे.
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येणार आहे. यानिमित्ताने पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीत गाड्यांच्या संचलनात बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनाही आता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; दरवर्षी २७ विद्यार्थ्यांची निवड, राज्य शासनाचा निर्णय
पादचाऱ्यांच्या सोयीसाठी नगरकर तालीम चौक-बाजीराव रस्ता-महापालिका भवन ते नगरकर तालीम या मार्गावर तीस मिनिटांच्या वारंवारीतेने तर स्वारगेट-उंबऱ्या गणपती चौक-स्वारगेट मार्गावर चाळीस मिनिटांच्या वारंवारीतेने गाड्या सोडण्यात येतील. डेक्कन-उंबऱ्या गणपती चौक-डेक्कन य मार्गावर दर तीस मिनिटांनी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय मेट्रो स्थानक येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी शिवाजीनगर रेल्वे स्थानक ते स्वारगेट या मार्गावरील जिल्हा सत्र न्यायालय मार्गे तर चार मिनिटांच्या वारंवारीतेने संचलनात ठेवण्यात येणार आहेत. पुण्यदशम मार्ग क्रमांक ७ आणि ९ बंद राहणार असून मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने आणि शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून नियमित संचलनात राहणार आहेत. मार्ग क्रमांक ८१, १४४, १४४अ, १४४ क आणि २८३ मार्गावरील गाड्या पुणे स्थानकाकडे जाताना नियमित मार्गाने आणि पुणे स्थानकावरून येताना महापालिका भवन मार्गे संचलनात राहणार आहेत.