लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) रावेत ते हिंजवडी आणि रावेत ते पिंपरी या दोन मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कर्मचाऱ्यांना होणार आहे. रावेत ते हिंजवडी आणि फेज (३) या मार्गावर ३७५ क्रमांक आणि रावेत ते पिंपरी या मार्गावर क्रमांक १३ नंबर बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘पीएमपी’च्या बस पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत ४७२ मार्गांवरून धावतात. मात्र, केवळ दोन ते तीन मार्ग फायद्यात असून, अन्य मार्ग तोट्यात असल्याने पीएमपी प्रशासनाने नवीन मार्गांसाठी सुधारित धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. रावेत परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून, सोसायट्या झाल्या आहेत. स्थानिकांना परिसरातून हिंजवडीला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नाही.

रावेत परिसरातून हिंजवडी आणि तळवडे भागात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रावेत ते हिंजवडी आणि रावेत ते पिंपरी या दोन मार्गावर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

Story img Loader