पुणे : पीएमपीतील महिला वाहकाशी आगार व्यवस्थापकाने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगार व्यवस्थापकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिला वाहकाने पीएमपी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केल्यानंतर दखल न घेतल्याने तिने आगार व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सुनील धोंडिबा भालेकर (वय ४४ ,रा. चऱ्होली), संजय कुसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला वाहकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाहक महिला पीएमपीत २०१८ पासून काम करत आहेत. ती पुणे स्टेशन आगारातील नियुक्तीस होती. सुनील भालेकर हा पुणे स्टेशन आगारात कामाला आहे. भालेकर वाहक महिलेला त्रास देत होता. तो तिचा पाठलाग करायचा. याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर भालेकर महिलेला तक्रार मागे घेण्यसाठी धमकावत हाेता. महिलेला त्याने शिवीगाळ करुन तिला मारहाण केली होती. याप्रकरणाची पीएमपी प्रशासनाने खातेअंतर्गत चौकशी केली. भालेकरची पीएमपीच्या नरवीर तानाजीवाडी आगारात बदली करण्यात आली. त्यानंतर महिलेने आगार व्यवस्थापक संजय कुसाळकर याने त्रास दिल्याचा आरोप करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिला तक्रार अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने तिला बोलाविण्यात आले होते. तिच्याबरोबर दोन मित्र होते.
चौकशीनंतर महिला मित्रांसोबत एका उपाहारगृहात नाश्ता करण्यासाठी गेली. तेथे भालेकर आला. त्याने पुन्हा अश्लील वर्तन केले. कुसाळकर यांच्याविरुद्ध तक्रार कशी केली, अशी विचारणा करुन त्याने तिला धमकावले. तिने पुन्हा पोलिसांकडे तक्रार दिली, तसेच राज्य महिला आयाेगाकडे तक्रार दिली. या घटनेनंतर कुसाळकर याने महिला वाहकाला निलंबित केले.
तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप करुन महिला कुसाळकर याच्या केबीनमध्ये गेली. तेथे तिने अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. त्यानंतर महिलेने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.