स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव; बस स्थानकांसाठीचा कोटय़वधीचा खर्च नक्की कशासाठी?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ लाख प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीला शहरात किती बस स्थानके आहेत, यासंबंधीची कोणतीही माहिती नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पीएमपी स्थानकांवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे बसस्थानकांवर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च नक्की कोणासाठी करण्यात येतो, असा प्रश्नही उपस्थित झाला असून वार्षिक किमान ७०० कोटींची उलाढाल असलेल्या पीएमपी प्रशासनाची निष्क्रियता त्यामुळे अधोरेखीत झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ११ लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. पीएमपीची सेवा प्रवासी केंद्रित होण्याची तसेच स्थानके आणि आगारांमध्ये प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पीएमपीची आहे. या पाश्र्वभूमीवर पीएमपी स्थानकांची सद्य:स्थिती, पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, गाडय़ांची माहिती देणारी यंत्रणा, विश्रांती कक्ष, पास केंद्र असा तपशील रुपेश केसेकर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पीएमपी प्रशासनाकडे मागितला होता. त्यातून अनेक दुरवस्था पुढे आल्या आहेत. शहरातील काही मोजक्याच स्थानकांवर किरकोळ स्वरूपात सुविधा उपलब्ध असल्याचे पीएमपीने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मिळून पीएमपीची १३ आगार आहेत. या आगाराअंतर्गत ७५ पेक्षा अधिक स्थानके असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या परिसरात सेवा देण्यात येते. मात्र अवघ्या १६ पीएमपी स्थानकांची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती अपुरी आणि अर्धवट असल्याचेही दिसून येत आहे. शहरात पीएमपीची स्थानके किती याची माहितीच नसल्यामुळे अर्धवट माहिती पीएमपीकडून देण्यात आल्याचे केसेकर यांना सांगण्यात आले. उर्वरित माहिती संकलित करून देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्याला तीन आठवडय़ांचा कालावधी झाला, तरी सुधारित माहिती देण्यात आलेली नाही, असे केसेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे आहे, असा दावा पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
लाखो प्रवाशांबरोबरच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही असुविधांची झळ बसत आहे. काही स्थानकांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा असली, तरी या सुविधांची कमालीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा वापर गोदामासाराखा करण्यात आला असून तेथे अनावश्यक, अडगळीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांशी स्थानकांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्षही नाही. तसेच १६ स्थानकांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहासारख्या सुविधा कमी-अधिक प्रमाणात आहेत.