पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी पुढील आठवड्यापासून धडक मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. हिंजवडी परिसरासह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसह अन्य प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार आहेत.

‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात सहआयुक्त डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक आणि होर्डिंग संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिली. उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रवींद्र रांजणे आणि सचिन मस्के, सहायक नगररचनाकार राहुल गिते, शाखा अभियंता विष्णू आव्हाड, ऋतुराज सोनवणे, दीप्ती घुसे, विशाल भोरे यांच्यासह होर्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे, उपाध्यक्ष शेखर मते उपस्थित होते.

हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत अवकाळी, वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे धोकादायक होर्डिंग काढण्याची आणि प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय नव्याने कोणतेही आकाशचिन्ह उभारण्यात येणार नाही, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. होर्डिंगधारकांनी ८ एप्रिलपर्यंत परवानगीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांच्या प्रती कार्यालयात सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रस्ताव सादर न करणाऱ्यांचे होर्डिंग अनधिकृत ठरवून त्यांवरील कारवाईच्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. रहदारीच्या जागेसह मुख्य चौकातील होर्डिंग काढण्यात येणार असून, दुर्घटना झाल्यास होर्डिंगधारकाला जबाबदार धरण्यात येणार आहे.

हिंजवडी परिसर, हवेली तालुका, वाघोली, मांजरी, नऱ्हेसह सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, पुणे-सातारा रस्ता, पौड रस्ता, हडपसर-दिवे घाट, पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-नाशिक रस्ता, पुणे-अहिल्यानगर रस्ता, सूस रस्ता, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यांबरोबरच वर्दळीच्या ठिकाणचे होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत, असे सूर्यवंशी-पाटील यांनी सांगितले.

बैठकीतील निर्णय

– परवानगीशिवाय नव्याने होर्डिंग उभारल्यास कारवाई

– एका होर्डिंगच्या संरचनेवर दोन किंवा जास्त होर्डिंगला मनाई

– नागरी क्षेत्रामध्ये रस्त्याच्या आरक्षित पट्ट्यात होर्डिंगला बंदी

– दुर्घटना घडल्यास मालक आणि जागामालक जबाबदार