शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाला ‘पीएमआरडीए’ची मंजुरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्याला ‘आयटी हब’ अशी ओळख मिळवून दिलेल्या हिंजवडीसाठी लवकरच मेट्रोचा मार्ग मंजूर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी केली आणि पाठोपाठ बुधवारी या मार्गाला मंजुरी देण्यात आली. हिंजवडी येथील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी या भागात मेट्रो व्हावी असा आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली असून हा मार्ग साडेतेवीस किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गाचे काम पीएमआरडीए मार्फत केले जाईल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीची (पुणे मेट्रोपोलिटिन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) बठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत पार पडली. या बठकीत या नव्या मार्गाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.

स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या मंजुरीनंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून या मार्गाचा सविस्तर आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या घोषणेला फक्त तीन दिवस होत असताना हा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना नववर्षांची भेट दिली आहे, असे बापट म्हणाले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पुण्याच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथे दोन लाखांहून अधिक अभियंते व कर्मचारी काम करत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुचाकी आणि चारचाकीसह सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असते.

तसेच सार्वजनिक आणि खासगी अशा एकूण ८८५ गाडय़ा याच मार्गावरून येत-जात असतात. पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची एकूण वार्षकि उलाढाल १५०० कोटी इतकी आहे. त्यापकी तब्बल पन्नास टक्के उपन्न हे फक्त हिंजवडी आयटी पार्कमार्फत प्राप्त होते. असे असतानाही येथे पायाभूत सुविधांची वानवा जाणवत होती. त्यामुळे या भागासाठी मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारणार

शिवाजीनगर ते हिंजवडी या साडेतेवीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केला आहे. या मार्गावर किती आणि कुठे मेट्रो स्थानके असतील तसेच या मार्गासाठी किती खर्च येणार आहे यासंबंधीच्या आराखडय़ाचे सादरीकरण मुंबईतील बैठकीत करण्यात आले. पीएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठय़ा प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmrda approved metro line from shivajinagar to hinjewadi