पुणे : शहर आणि परिसरातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) धडक मोहीम राबविण्यात येत असून गेल्या नऊ दिवसांत सुमारे दोन हजार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईत दोन लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र मोकळे करण्यात आल्याने रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.

शहर आणि परिसरात काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत गेल्या नऊ दिवसांत १ हजार ९९२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एक लाख ९९ हजार दोनशे चौरस मीटरवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यात प्रामुख्याने वर्दळ असणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यावर भर देण्यात येत आहे.

पुणे-नाशिक रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि चांदणी चौक ते पौड रस्ता या भागातील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणावर पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. या धडक मोहिमेदरम्यान काही अतिक्रमणधारक स्वतःहून आपले अतिक्रमणे काढून घेत आहेत.शहरासह परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत कारवाई वेगाने करून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येतील. डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

कारवाईचा तपशील

पुणे-नाशिक रस्ता

रस्त्याचे एकूण अंतर – २६ किलोमीटर

कारवाईची संख्या – ७०२

कारवाईचे अंदाजित क्षेत्रफळ- ७०२०० चौरस फूट

पुणे-सोलापूर रस्ता

रस्त्याचे एकूण अंतर – २५ किलोमीटर

कारवाईची संख्या – ७७२

कारवाईचे अंदाजित क्षेत्रफळ – ७७२०० चौरस फूट

चांदणी चौक-पौड रस्ता

रस्त्याचे एकूण अंतर – १६ किलोमीटर

कारवाई संख्या – ५१८

कारवाईचे अंदाजित क्षेत्रफळ – ५१८०० चौरस फूट