पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या लाॅटरीची बुधवारी (१२ फेब्रुवारी) सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने मुंबई येथे होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका आणि एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३ हजार २५६ अर्ज अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित १५ लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत २२ जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, मुंबईबरोबरच स्थानिक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यलायतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार असून अर्जदारांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.